`रुपे’ कार्डापेक्षा बँकाची व्हिसा, मास्टर कार्डना पसंती

ऑनलाईन व्यवहारांसाठी ग्राहकांना ‘रुपे’ कार्डाऐवजी व्हिसा आणि मास्टर कार्ड देण्याकडे बँकांचा कल वाढला आहे. रुपे कार्डाद्वारे ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी आकारली जाणारी फी जास्त असल्याने बँकांनी ग्राहकांना हे कार्ड देणे जवळजवळ थांबवले आहे. पवई येथील आयआयटी मुंबईने यासंदर्भात केलेल्या अभ्यासातून ही बाब उघड झाली आहे.
ऑनलाईन व्यवहारांवरील फीमध्ये वाढ केल्यामुळेच रुपे कार्डाकडे बँका व अन्य आर्थिक संस्थांनी कानाडोळा केला आहे. त्या तुलनेत व्हिसा आणि मास्टर कार्ड कमी फी आकारत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आयआयटी मुंबईतील प्राध्यापक आशिष दास यांनी हा अभ्यास केला.

सप्टेंबर 2019 ते ऑगस्ट 2020 या कालावधीत कमीत कमी रुपे काड्र्स ग्राहकांना दिली गेली असे अभ्यासात उघड झाले. 2019 च्या ऑगस्ट महिन्यात 4.6 कोटी रुपे कार्ड दिली गेली होती. ऑगस्ट 2020 मध्ये फक्त 65 लाख रुपये काड्र्स दिली गेली. रुपेपेक्षा व्हिसा आणि मास्टर काड्र्सना प्राधान्य दिले जात आहे यामागे मर्चन्ट्स डिस्काऊंट रेट (एमडीआर) जबाबदार असल्याचे प्रा. दास सांगतात.

देशात डिजिटल पेमेंट वाढले

रिझर्व्ह बँकेने अलिकडेच दिलेल्या माहितीनुसार मागील आर्थिक वर्षात रुपे कार्डाद्वारे ऑनलाईन आणि ऑफलाईन असे सुमारे एक अब्ज व्यवहार झाले. त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात 667 दशलक्ष व्यवहार रुपे कार्डाद्वारे झाले होते. यूपीआय नेटवर्कवरून चालू महिन्यापर्यंत 1.78 अब्ज व्यवहार झाले असून तो आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.

अहवालात देण्यात आलेले सल्ले

  • कार्डद्वारे करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या ऑनलाईन व्यवहारांसाठी एमडीआर हा सरसकट 0.6 टक्के ठेवावा.
  • दोन कोटी रुपयांपर्यंतच्या वार्षिक व्यवहारांसाठी 0.6 टक्के इतकाच एमडीआर ठेवण्यात यावा.
  • छोट्या व्यापाऱ्यांसाठी दोन हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारासाठी एमडीआर हा 0.25 टक्के असावा आणि दोन हजारांवरच्या व्यवहारासाठी तो 0.6 टक्के ठेवावा.
  • दीडशे रुपयांपासूनच्या व्यवहारांसाठी इतकेच सिलिंग ठेवावे.
आपली प्रतिक्रिया द्या