
मध्य रेल्वेवरील व्हिस्टा डोम डब्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुंबई- गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या आणि धबधब्यांची मनमोहक दृश्ये, मुंबई – पुणे मार्गावरील पश्चिम घाटाची नयनरम्य दृश्ये याचा आनंद प्रवाशांना घेता येत आहे. त्यामुळे काचेचे टॉप आणि रुंद खिडक्या असलेले हे डब्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मध्य रेल्वेने एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2022 या सहा महिन्यांत 56,895 प्रवाशांची या डब्यातून प्रवास केला असून 7.32 कोटी रुपयांचा महसूल जमवला आहे. मुंबई – मडगाव – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस ही 100 टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे 16,078 प्रवासीसंख्येसह सर्वात पुढे असून 3.35 कोटींचा महसूल मिळविला आहे. मुंबई -पुणे- मुंबई डेक्कन क्वीनने अप दिशेने पुणे ते मुंबई दरम्यान 1.43 कोटींच्या महसूलासह 99 टक्के वहिवाट (occupancy) नोंदवली आहे. मुंबई- पुणे – मुंबई डेक्कन एक्स्प्रेस ने 100% वहिवाट (occupancy) सह म्हणजेच 16,190 प्रवासीसंख्या आणि 1.26 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे.
वर्ष 2018 मध्ये मुंबई- मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये विस्टाडोम कोच पहिल्यांदा मध्य रेल्वेत आले. प्रवाशांच्या प्रचंड प्रतिसादामुळे, मुंबई – मडगाव मार्गावरील दुसरा विस्टाडोम कोच 15 सप्टेंबर 2022 पासून तेजस एक्सप्रेसला जोडण्यात आला आहे. या डब्यांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे हे डबे मुंबई – पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये 26 जून 2021 पासून सुरू करण्यात आले आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मुंबई-पुणे मार्गावरील आणखी दोन विस्टाडोम डबे डेक्कन क्वीनला 15 ऑगस्टपासून आणि प्रगती एक्स्प्रेसमध्ये 25 जुलैपासून जोडण्यात आले. तसेच पुणे – सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्ये देखील एक विस्टाडोम कोच 10 ऑगस्टपासून जोडण्यात आला आहे.
व्हिस्टाडोम डब्यांमध्ये काचेच्या छताशिवाय रुंद खिडक्या, एलईडी दिवे, फिरता येण्याजोग्या सीट आणि पुशबॅक खुर्च्या, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लाइडिंग कंपार्टमेंट डोअर्स, दिव्यांगांसाठी रुंद बाजूचे सरकते दरवाजे, सिरेमिक टाइल फ्लोअरिंग असलेली टॉयलेट इत्यादी अनेक वैशिष्ट्यांसह आकर्षक व्ह्यूइंग गॅलरी आहे.
























































