
देशभरातून 2019 ते जानेवारी 2025 दरम्यान गोळा केलेल्या 22 लाखांहून अधिक व्हिटॅमिन D चाचण्यांच्या निकालांवर आधारित एक व्यापक राष्ट्रीय विश्लेषण प्रसिद्ध करण्यात आले आहे. अमीरा शाह यांच्या नेतृत्वाखालील मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेड या हिंदुस्थानातील दुसऱ्या सर्वात मोठ्या आणि विश्वासार्ह पॅथॉलॉजी लॅब चेनद्वारे हा अभ्यास करण्यात आला.
तपासणी केलेल्या एकूण लोकांपैकी 46.5 टक्के लोकांमध्ये व्हिटॅमिन D ची कमतरता आहे, तर आणखी 26 टक्के लोकांमध्ये पातळी अपुरेशी आढळली. हे आकडे दर्शवतात की आरोग्याबद्दल जागरूक असलेल्या लोकांमध्ये सुद्धा व्हिटॅमिन D ची कमतरता मोठ्या प्रमाणावर आहे. या निष्कर्षांमुळे प्रतिबंधात्मक जागरूकता, योग्य आहार आणि नियमित तपासणी यांची गरज अधोरेखित होते, असे या अभ्यासातून समोर आले आहे.
प्रदेशनिहाय पाहता, हिंदुस्थानात मोठ्या प्रमाणात फरक दिसून आला. दक्षिण हिंदुस्थानात सर्वाधिक कमतरता (51.6 टक्के) नोंदली गेली. ज्यात केरळ, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू येथे 50 टक्के पेक्षा जास्त लोक प्रभावित आहेत. त्यानंतर मध्य हिंदुस्थानात कमतरता 48.1 टक्के, उत्तर हिंदुस्थानात 44.9 टक्के, तर पश्चिम हिंदुस्थान ज्यामध्ये महाराष्ट्र (42.9 टक्के) समाविष्ट आहे. तुलनेने चांगली स्थिती आढळली. ईशान्य हिंदुस्थानात (36.9 टक्के) सर्वात कमी कमतरता दिसली, जी तेथील बाहेरच्या जीवनशैलीचा आणि विविध आहाराचा फायदा दर्शवते.
हे निष्कर्ष सूचित करतात की फक्त भूगोल नव्हे तर शहरी जीवनशैली, सूर्यप्रकाशाचा कमी संपर्क आणि चुकीच्या आहाराच्या सवयी हे भारतातील व्हिटॅमिन D कमतरतेचे मुख्य कारण आहेत.
डेटामधून हेही दिसून आले की हळूहळू सुधारणा होत आहे. 2019–20 मध्ये जिथे कमतरता सुमारे 51 टक्क होती, ती 2023–24 मध्ये घटून 43 टक्के झाली आहे. हा ट्रेंड उत्साहवर्धक असला तरी, नियमित तपासणी, पोषणपूरक उपाय आणि सार्वजनिक जागरूकता यांचा सातत्याने प्रचार करणे गरजेचे आहे, जेणेकरून दीर्घकालीन आरोग्य समस्यांना आळा बसू शकेल.
किशोरवयीन आणि कामकाज करणाऱ्या वयोगटातील लोकांमध्ये व्हिटॅमिन D ची कमतरता सर्वाधिक दिसून आली आहे, कारण या गटातील लोक जास्तीत जास्त वेळ घरात घालवतात आणि सूर्यप्रकाशात कमी वेळ घालवतात.
लिंगानुसार पाहता, महिलांमध्ये 46.9 टक्के आणि पुरुषांमध्ये 45.8 टक्के कमतरता आढळली. म्हणजेच महिलांमध्ये पोषण आणि डायग्नॉस्टिक सेवांपर्यंतचा प्रवेश आता सुधारला आहे. “व्हिटॅमिन D ची कमतरता ही भारतात सर्वाधिक दुर्लक्षित आरोग्य समस्या आहे. तिचे परिणाम हळूहळू दिसतात. पण खूप व्यापक असतात. हाडांचे आरोग्य, रोगप्रतिकारक शक्ती आणि एकंदर आरोग्य यावर ती थेट परिणाम करते, असे श्री. सुरेंद्रन चेम्मेनकोटिल, मॅनेजिंग डायरेक्टर, मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेड, म्हणाले.






























































