115 दगडांतून साकारली विठ्ठल-रखुमाई आणि वारकरी कलाकृती, माणगावच्या सुकन्येचा अनोखा कलाविष्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कलाकार त्याच्या कलेतही भगवंताला पाहात असतो. आपल्या कलेत देवाचे रूप साकारून इतरांना आनंद देण्याची एखाद्या कलावंताच्या कौशल्याला नेहमीच दाद मिळत असते, अशा प्रकारे विविध प्रकारच्या दगडांत विठ्ठल-रुक्मिणीचे रूप साकारलेय माणगावच्या एका लहान शिल्पकार मुलीने. ऋतिका विजय पालकर, असे तिचे नाव आहे.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने माणगाव येथील शिल्पकार ऋतिका विजय पालकर हिने 115 दगडांपासून विठ्ठल-रखुमाई आणि वारकरी मंडळी अशी कलाकृती साकारली आहे. तिच्या या अनोख्या कलाकृतीकडे सगळ्यांचे लक्ष वेधले जात आहे. सलग 15 दिवस अथक परिश्रमाने वैशिष्ट्यपूर्ण विविध प्रकारचे 115 दगड गोळा करून त्या दगडांचा मूळ आकार न बदलता विठ्ठल-रखुमाई आणि वारकरी मंडळी अशी कलाकृती तिने साकारली आहे.

यापूर्वीही तिने अनेक शिल्प कलाकृती बनवून पुणे, मुंबई, दिल्ली अशा विविध ठिकाणी आपल्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवले होते. तिची प्रत्येक कलाकृती वैशिष्ट्यपूर्ण असून इतरांना आकर्षित करणारी असते. निसर्गात सापडणाऱ्या नैसर्गिक आकाराच्या दगडांपासून ती विविध प्रकारची शिल्पे साकारत असते. तिच्या या आगळ्यावेगळ्या कलेचे कौतुक मान्यवरांकडून करण्यात आले.