
‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिसराचा नव्याने विकास साधताना पुरातन वास्तूंचे संवर्धन करण्यासाठी मंदिर समितीने पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार तत्काळ तपशील शासनाकडे सादर करावा,’ अशी सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी दिली.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संवर्धन आराखडा आणि पंढरपूर नगरपालिकेच्या विविध विकासकामांबाबत ‘संत तुकाराम भवन’ येथे आयोजित आढावा बैठकीत डॉ. नीलम गोऱहे बोलत होत्या. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, समितीचे सदस्य जानेश्वर महाराज जळगावकर, शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (ऑनलाइन), अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, प्रांताधिकारी अप्पासाहेब समिंदर, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.
डॉ. नीलम गोऱहे म्हणाल्या, ‘पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शानुसार नव्याने विकास करण्यात येणाऱया कामांचा तपशील 2 मेपर्यंत विधी व न्याय विभागाला सादर करा. जिल्हा प्रशासन व मंदिर समितीने भाविकांना विश्वासात घेऊन संपूर्ण आराखडय़ाचे सादरीकरण करावे. यमाई तलाव व परिसराची सुधारणा करण्यासाठी नगरपालिकेने आराखडा तयार केला असून, त्यामध्ये ‘अर्बन फॉरेस्ट’सारखा नावीन्यपूर्ण प्रकल्प राबवावा,’ अशी सूचनाही त्यांनी दिली.

























































