
श्री विठ्ठल मंदिरात वसंत पंचमीच्या शुभमुहुर्तावर विठ्ठल-रुक्मिणीचा शाही विवाहसोहळा शनिवारी मोठय़ा उत्साह आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. मंदिराच्या सभामंडपात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा विवाह सोहळा मर्यादित वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत पार पडला.
वसंत पंचमीला श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह झाला होता, अशी आख्यायिका आहे. त्यानुसार दरवर्षी हा विवाहसोहळा मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल मंदिरात साजरा करून परंपरा जपली जात आहे. हा विवाहसोहळा दिमाखदार करण्यासाठी संपूर्ण मंदिर आणि गाभारा झेंडू, शेवंती, गुलाब, निशीगंध, कामिनी, ऍस्टर, जर्बेरा, तुळशी आदी आकर्षक फुलांनी सजविला होता. पुणे येथील भाविक भारत भुजबळ यांनी मोफत फुलांची आरास केली. सकाळी 11 वाजता श्री विठ्ठलाला पांढराशुभ्र पोशाख आणि रुक्मिणीला शुभ्र वस्त्र, मोत्याचे दागिने, नथ, हिरवा चुडा आणि शुभ्र सुवर्णालंकारांनी सजवले होते.
दरम्यान, सकाळी 10 ते 12 या वेळेत विवाहसोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी स्वयंवर कथेचे निरूपण येथील भागवत कथाकार व प्रवचनकार अनुराधा शेटे यांनी सादर केले. सकाळी 11 वाजता रुक्मिणीमातेच्या गाभाऱयातून श्री विठ्ठलाकडे गुलाल नेला आणि तिथे गुलालाची उधळण केली. त्यानंतर विठ्ठलाचा गुलाल रुक्मिणीमातेकडे नेण्यात आला व तिथेही गुलालाची उधळण करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचे अलंकाराने सजविलेली उत्सवमूर्ती वरबाप, वरमाय सभामंडपात विवाहसोहळ्याच्या ठिकाणी घेऊन आले. या वेळी दोन्ही देवतांना मंडावळ्या बांधल्या होत्या. अंतरपाट धरण्यात आला. 12 वाजताच्या शुभमुहुर्तावर विवाह लावण्यात आला.



























































