
युक्रेनविरुद्धचे युद्ध थांबवण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढे अट घातली आहे. युक्रेनचा डोनेस्क हा प्रांत आम्हाला द्या, आम्ही युद्ध थांबवतो, असे पुतीन यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेत पुतीन यांनी ही अट ठेवल्याचे समजते. रशियाने 2014पासून डोनेस्कच्या काही भूभागावर कब्जा केला आहे. मात्र अद्याप हा संपूर्ण प्रांत ताब्यात घेण्यात रशियाला यश आलेले नाही. युक्रेनची राजधानी कीवला जोडणारा हा प्रांत असल्याने युक्रेनचे सैन्य येथे तळ ठोपून आहे. युक्रेनी सैन्याच्या प्रतिकारापुढे रशियाला माघार घ्यावी लागत आहे. त्यामुळेच युद्ध थांबवण्याच्या बदल्यात तो प्रांत मिळवण्याचा प्रयत्न पुतीन यांनी चालवला आहे.
रशियावर आणखी दबाव आणा – झेलेन्स्की
युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियावर आणखी दबाव आणण्यासाठी ट्रम्प यांना साद घातली आहे. पुतीन हे हमाससारखेच आहेत. पण त्यांच्यापेक्षा शक्तिशाली आहेत. त्यांच्याकडे जगातील दुसऱया क्रमांकाचे मोठे लष्कर आहे. त्यामुळेच त्यांच्यावर जास्तीत जास्त दबाव आणायला हवा, असे झेलेन्स्की म्हणाले.