
जिल्ह्यात गेल्या 20-25 दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, राजकीय वातावरण तापले आहे. नगर जिह्यातील एकूण 14 बाजार समित्यांची निवडणूक दोन टप्प्यांत होत असून, पहिल्या टप्प्यातील 7 बाजार समित्यांसाठी उद्या (दि. 28) मतदान होत आहे. त्यामध्ये नगर, राहुरी, संगमनेर, पाथर्डी, श्रीगोंदा, पारनेर, कर्जत या बाजार समित्यांचा समावेश आहे. राहुरी बाजार समितीची उद्या सायंकाळी, तर उर्वरित 6 बाजार समित्यांची शनिवारी (दि. 29) मतमोजणी होणार आहे.
बाजार समिती निवडणुकीनंतर नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक असल्यामुळे सर्वच नेते मंडळी कामाला लागली असून प्रचारात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, तर काही ठिकाणी भाजप, काँग्रेस, मनसे अशी अशक्य वाटणारी युतीही झाली आहे. ग्रामीण भागाच्या अर्थकारणात बाजार समित्यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे या समित्या ताब्यात घेण्यासाठी राजकीय नेत्यांनी जोर लावला आहे.
नगर बाजार समितीत कर्डिले गटाला बाहेर काढण्यासाठी येथील स्थानिक नेत्यांच्या महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. या निवडणुकीत कर्डिले यांचे पुतणे रोहिदास कर्डिलेच त्यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, प्रा. शशिकांत गाडे, शरद झोडगे यांनीही बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. विरोधक एकवटले असले तरी कर्डिलेंना मिळत असलेली विखेंची साथ ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली आहे. येथे कर्डिले गटाचे दोघे बिनविरोध निवडून आले असून, 16 जागांसाठी 35 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
नगर जिह्यातील दक्षिण भागातील बाजार समित्यांत फक्त भाजपला रोखण्याच्या उद्देशाने अशक्य वाटतील अशी हातमिळवणी झाली आहे. पारनेरमध्ये माजी आमदार विजय औटी आणि आमदार नीलेश लंके यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. तरीदेखील खासदार विखे यांना शह देण्यासाठी हे दोघे वाद विसरून एकत्र आले आहेत. समितीतील 18 जागांची तीन पक्षांत वाटणी करत त्यांनी पॅनेल तयार केले आहे. येथे भाजपचेही पॅनेल असून, माजी जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरेंची विखेंना साथ मिळत आहे.
पाथर्डी बाजार समितीतही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रताप ढाकणे आणि भाजप आमदार मोनिका राजळे यांच्यात लढत होत आहे. बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने विधानसभा निवडणुकीतील पराभवाची काही प्रमाणात का होईना परतफेड करण्याची संधी ढाकणे यांना मिळाली आहे. ढाकणे यांनी यावेळी येथे जुन्या संचालकांना डच्चू देत सर्वच जागांवर नव्या चेहऱयांना संधी दिली आहे. आता त्यांची ही खेळी कितपत यशस्वी ठरते हे निवडणुकीच्या निकालानंतरच समोर येईल. पंधरा संचालकांना त्यांनी घरचा रस्ता दाखवला आहे. त्यांच्या या डावपेचाची जोरदार चर्चा सुरू आहे. येथे 18 जागांसाठी 37 जण निवडणूक रिंगणात आहेत.
श्रीगोंदा बाजार समितीमध्येही रंगतदार लढत असून, येथे निवडणुकीपूर्वीच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्याने ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे. येथे नागवडे-पाचपुते विरुद्ध माजी आमदार राहुल जगताप यांच्या गटात लढत होत असून, ही विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम ठरण्याची शक्यता आहे. येथे 18 जागांसाठी 48 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
संगमनेर बाजार समितीमध्ये प्रथमच आजी-माजी महसूल मंत्र्यांचे पॅनेल आमने-सामने असून, विखे यांनी प्रथमच या निवडणुकीत थोरातांपुढे आव्हान उभे केले आहे. येथे 18 जागांसाठी 45 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
- राहुरी बाजार समितीत यंदा माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले व विखे यांच्या पॅनेलमध्ये लढत होणार आहे. कर्डिलेंना विखे गटाचीही साथ मिळाल्याने त्यांचे बळ वाढले आहे. त्यामुळे येथील लढत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. नगर बाजार समितीत शिवाजी कर्डिलेंविरोधात तनपुरे हे प्रचार करत आहेत. तर कर्डिले हे विखेंच्या मदतीने बाजार समिती कशी ताब्यात घेता येईल, यासाठी राजकीय डावपेच टाकत आहेत. दोघांसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. येथे 18 जागांसाठी 3 अपक्षासह 39 जण रिंगणात आहेत. शुक्रवारी मतदान झाल्यानंतर लगेच संध्याकाळी मतमोजणी होणार आहे.
- कर्जत-बाजार समितीची निवडणूक जिल्ह्यातच नाही तर राज्यभरात चर्चेत आहेत. आमदार राम शिंदे यांनी रोहित पवार यांना धक्का देत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर यांना भाजपच्या पॅनेलमधून उमेदवारी दिली आहे. या प्रकाराची दखल घेत जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी तापकीर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. कर्जत समितीची निवडणूक तिरंगी होईल, असे वाटत होते. मात्र, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे समर्थक अंबादास पिसाळ यांची नाराजी दूर करण्यात शिंदे यांना यश आले. त्यामुळे पिसाळ यांची तिसरी आघाडी प्रत्यक्षात न येता त्यांना शिंदे यांच्यासोबत जावे लागले. याआधी नगरपंचायतीच्या निवडणुकीत काही जागा बिनविरोध करत आमदार रोहित पवार यांनी आमदार शिंदे यांना धक्का दिला होता. या निवडणुकीत त्याची परतफेड करत शिंदे यांनी पवारांना धक्का दिला आहे. येथे 18 जागांसाठी 45 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत.



























































