आता निवडणुका व्हीव्हीपॅट मशीनवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
2013 साली व्हीव्हीपॅट यंत्रणा देशात पहिल्यांदा राबवली गेली. नागालँडमधल्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला.

सामना ऑनलाईन, मुंबई

आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनला शिवसेनेने कडाडून विरोध केला असला तरी पुढील निवडणुकांमध्ये मुंबईसह महाराष्ट्रात व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सप्टेंबर महिन्यात 3 हजार 298 व्हीव्हीपॅट मशीन्स बंगळुरूहून मुंबईत दाखल होत आहेत, अशी माहिती मुंबईचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी आज दिली.
केंद्रीय निवडणूक आयोगाने मुंबईसह महाराष्ट्रात मतदार यादीत नाव नोंदणीसाठी मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याची माहिती देण्यासाठी मुंबई शहराचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

आगामी निवडणुकीत ईव्हीएम मशीन नको, बॅलेट पेपरच हवा, अशी आग्रही मागणी शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे केली आहे. याकडे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांचे लक्ष वेधले असता आगामी निवडणुकांमध्ये मतदानासाठी ईव्हीएम मशीन्सचा वापर होईल असे निवडणूक आयुक्तांनी यापूर्वीच राजकीय पक्षांकडे स्पष्ट केले आहे असे ते म्हणाले. राजकीय पक्षांकडून आयोगाने आक्षेप नोंदवून घेतले आहेत. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार होऊ शकत नाही असे आढळून आले आहे. राजकीय पक्षांच्या शंका दूर करण्यात येतील असेही आयोगाने स्पष्ट केले आहे, असे जोंधळे म्हणाले.

व्हीव्हीपॅटचा प्रथमच वापर
मतदानासाठी व्हीव्हीपॅट मशीन्सचा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये प्रथमच वापर होईल. पोटनिवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीन्सचा वापर यापूर्वी झाला आहे. व्हीव्हीपॅट मशीनवर मतदान केल्यावर कोणत्या उमेदवाराला मतदान केले त्याचे चिन्ह व नाव बाजूच्या डिस्प्लेवर दिसेल व मतदान केल्याची चिठ्ठी बाजूच्या ट्रेमध्ये खाली पडेल. या मशीनवर 15 उमेदवारांची नावे व ‘नोटा’चे एक मत अशी 16 बटणे असतील. त्यापेक्षा अधिक उमेदवार असल्यास दुसरे व्हीव्हीपॅट मशीन वापरण्यात येईल.

मुंबईत मशीन्स येणार
मुंबई शहराच्या हद्दीतील दक्षिण मुंबई व दक्षिण-मध्य मुंबई या लोकसभेच्या दोन मतदारसंघांत 47 मतदान केंद्रांची वाढ झाली आहे. या मतदान केंद्रांसाठी 5 हजार 672 नवीन ईव्हीएम मशीन्स, 2 हजार 592 कंट्रोल युनिट तर
3 हजार 298 व्हीव्हीपॅट मशीन्स 2 सप्टेंबर रोजी मुंबईत येतील. नवीन ईव्हीएम मशीन्स काळाचौकी येथील ललित कला भवनच्या गोदामात तर व्हीव्हीपॅट मशीन्स परळ येथील साईबाबा मार्ग महापालिका शाळेतील गोदामात ठेवण्यात येतील, असे जोंधळे यांनी सांगितले.