बिहारमध्ये रस्त्यावर आढळल्या VVPAT स्लिप्स, आरजेडीने निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह

शनिवारी बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील सरायरंजन विधानसभा मतदारसंघात केएसआर कॉलेज रस्त्याच्या कडेला व्हीव्हीपॅट स्लिप्स आढळल्याने गोंधळ उडाला आहे. याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) X वर शेअर केला आहे. X वर पोस्ट करत आरजेडीने निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

आरजेडीने X वर व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, “समस्तीपूरच्या सरायरंजन विधानसभा मतदारसंघातील केएसआर कॉलेजजवळ रस्त्याच्या कडेला ईव्हीएममधील मोठ्या प्रमाणात व्हीव्हीपॅट स्लिप्स फेकल्या गेल्या. या स्लिप्स कधी, कसे, का आणि कोणाच्या इशाऱ्यावरून फेकण्यात आल्या? चोर आयोग याचे उत्तर देईल का? हे सर्व लोकशाहीच्या दरोडेखोरांच्या इशाऱ्यावर घडत आहे का, जे बाहेरून येऊन बिहारमध्ये तळ ठोकून आहे?

मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांनी या प्रकरणात तातडीने कारवाई केली असून निष्काळजीपणाच्या आरोपाखाली संबंधित सहाय्यक निवडणूक अधिकारी (ARO ) यांना निलंबित केले. त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर आता निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.