
वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाण्याच्या कोठडीतील विजय सिंग या तरुणाच्या मृत्यू प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. या प्रकरणी सर्वंकष चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मृत विजय सिंग यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या वेळी सिंग कुटुंबीयांसमवेत आमदार कॅप्टन तमिल सेल्वन, कृपाशंकर सिंह आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस मानव अधिकार आयोगात विजय सिंग यांचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची मानव अधिकार आयोगामार्फत चौकशी करण्याची मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व प्रवक्ते नवाब मलिक यांनी मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष एम.ए. सईद व अतिरिक्त सचिव व्ही.के. गौतम यांची भेट घेतली. या तक्रारीवर मानव अधिकार आयोगात 14 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ऍड. आनंद काटे ही केस लढवणार आहेत.
सरकार मृत तरुणाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी
या प्रकरणात पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकासह पाच पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पुढे चौकशीत दोषी आढळणाऱयांवर कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य सरकार मृत तरुणाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
























































