दहावीतील विद्यार्थीनीवर वर्गात घुसून चाकूहल्ला, वडगाव शेरीतील घटनेने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलीवर हल्लेखोराने वर्गात घुसून चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास वडगाव शेरी परिसरात घडली. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून, तिची प्रकृती स्थिर आहे. हल्लेखोरानेही विषप्राशन करून आणि हाताची नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. एकतर्फी प्रेमातून त्याने मुलीवर हल्ला केल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कपिल भट (वय 21, रा.धनलक्ष्मी सोसायटी, वडगाव शेरी) असे हल्लेखोराचे नाव असून, त्याच्याविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव शेरीतील एका शाळेत मेरीतील दहावीतील विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी सोमवारी सकाळी समारंभाचे आयोजन केले होते. कार्यक्रम सुरू असतानाच हल्लेखोर कपिल भट थेट वर्गात शिरला. त्याने मुलीवर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर कपिलने शाळा परिसरातच विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

मुलीवर अचानक हल्ला झाल्याच्या घटनेने इतर विद्यार्थिनींसह शिक्षकांमध्ये घबराट पसरली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विद्यार्थिनीला शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी उपचारासाठी माहिती मिळताच पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख, वरिष्ठ निरीक्षक सुनील जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली.

हल्लेखोर कपिल आणि जखमी विद्यार्थीनी एकमेकांच्या ओळखीचे असण्याची शक्यता आहेत. कपिल याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, शाळेत सुरक्षारक्षक होता की नाही, याबाबत माहिती मिळू शकली नाही.

विद्यार्थिनीवर चाकूने वार करून हल्लेखोराने स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू असून, याप्रकरणी अधिकचा आणखी तपास सुरू आहे.  रोहिदास पवार, पोलीस उपायुक्त, झोन चार

एकतर्फी प्रेमातून मुलींवर हल्ल्याच्या घटना

– एकतर्फी प्रेमातून १२ ऑक्टोबरला हल्लेखोराने कबड्डीपटू विद्यार्थिनी क्षीतिजा व्यवहारे हिचा भोसकून खून केला होता. ही घटना बिबवेवाडीतील यश लॉन्स परिसरातील मैदानावर घडली होती. हल्ल्यात त्याने मुलीवर तब्बल ४२ वार केल्याचे तपासात उघडकीस आले होते.
– तीन वर्षांपूर्वी एकतर्फी प्रेमातून टिळक रस्त्यावर एका तरुणाने तरुणीवर अॅसिड हल्ला करून आत्महत्या केल्याची घटना तीन वर्षांपूर्वी घडली होती.

गस्त वाढविण्याची मागणी

शाळा, महाविद्यालय परिसरात मुलींचा पाठलाग करणे, छेडछाडीच्या घटनांमुळे पालकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिसांकडून बीट मार्शल, दामिनी पथकांची गस्त वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.

विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेणार कोण?

विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेणे शाळांसह पोलिसांचे कर्तव्य आहे. प्रत्यक्षात हल्लेखोर थेट चाकू घेऊन वर्गात शिरेपर्यंत त्याची विचारपूसही करण्यात आली नाही. त्यामुळे सुरक्षारक्षकापासून ते विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. महिलांसह विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांचे दामिनी पथक कार्यरत आहे. त्यांना माहिती मिळाल्यानंतरच टवाळखोरांविरुद्ध कारवाई होते.