वडवळ नागनाथ – दुचाकी-कारच्या भीषण अपघातात एक जण ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वडवळ नागनाथ येथे दुचाकी आणि कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी लातूर-नांदेड या राष्ट्रीय महामार्गावरील नांदगावपाटीजवळ (ता.चाकूर) घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लातूररोड (ता.चाकूर) येथील गोविंद निवृत्तीराव भदाडे (वय 37) हे पुणे येथील एका खासगी कंपनीत कामाला होते. काही कामानिमित्त ते आपल्या आईला भेटण्यासाठी रविवारी रात्री ते पुण्याहून दुचाकीवरून (एम.एच.14.जे.के.1247) आपल्या गावाकडे येत असताना सोमवारी सकाळी लातूर- नांदेड या राष्ट्रीय महामार्गावरील नांदगावपाटीजवळ असलेल्या मोतोश्री लंच होम समोर नांदेडहून- लातूरकडे निघालेल्या फोर्ड कंपनीच्या फोरव्हिलरची (एम.एच.26-.बी.क्यू.9999) समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील गोविंद भदाडे हे जागीच ठार झाले.

दरम्यान, अपघातची माहिती मिळताच घरणी येथील राष्ट्रीय महामार्गाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हरिदास उळागड्डे, जमादार दत्तात्रय गिरी, नितीन चव्हाण, राहुल गव्हाणे यांनी घटनास्थळी जाऊन तात्काळ वाहतूक सुरळीत केली.

यावेळी चाकूरचे पोलीस निरीक्षक सोपानराव सिरसाट, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कामत, पोलिस जमादार भागवत मामडगे, चालक सुशिल दिवटे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, मयत भदाडे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला आहे. भदाडे यांच्या पश्चात आई मैनाबाई भदाडे (सदस्या- ग्रामपंचायत लातूर रोड), भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. गोविंदच्या अपघाती निधनाची बातमी येताच लातूररोड गावावर शोककळा पसरली.