
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या विरोधात बंड करणारे वेग्नर या खासगी लष्करी गटाचे प्रमुख येवजेनी प्रिगोझिन यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मॉस्को आणि सेंट्स पीटर्सबर्गच्या दरम्यान हा अपघात झाला. अपघातानंतर जारी करण्यात आलेल्या मृत प्रवाशांच्या यादीत येवजेनी प्रिगोझिन यांचेही नाव असल्याचे सांगण्यात आले.
दोन महिन्यांपूर्वी रशियात वेग्नर या खासगी लष्करी गटाने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या विरोधात बंड पुकारले होते. मात्र तीन दिवसांतच या गटाने पांढरे निशाण फडकावले. थेट राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनाच येवजेनी प्रिगोझिन यांनी आव्हान दिले होते. परंतु काही मोजक्या अटींवर हे बंड शमले. प्रिगोझिन तसेच त्यांच्या वेग्नर गटावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येणार नाही असे चर्चेत ठरले होते. बंडानंतर दोन महिन्यांनी प्रिगोझिन यांच्या मृत्यूचे वृत्त आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
येवजेनी प्रिगोझिन हे एकेकाळी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या अत्यंत निकटवर्तुळातील एक मानले जात होते. उपाहारगृहे आणि खाद्यसेवा पुरवणार्या त्यांच्या कंपन्या आहेत. रशियन सत्ताकेंद्र क्रेमलिनलाही प्रिगोझिन यांचीच कंपनी खाद्यपुरवठा करते. त्यामुळेच पुतीन यांचे ‘शेफ’ अशीही त्यांची ओळख होती.
























































