
कामोठे उड्डाणपुलावर उभ्या नादुरुस्त ट्रकला पाहून अचानक वॅगनर चालकाने ब्रेक मारल्याने अपघात झाला. आज सकाळी झालेल्या या विचित्र अपघातात सहा गाड्या एकमेकांना धडकल्या. यामध्ये वॅगनरमधील एकाचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की वॅगनर कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. या घटनेने सायन-पनवेल महामार्गावर काही काळासाठी वाहतूककोंडी झाली होती.
सायन-पनवेल महामार्गावर असलेल्या कामोठे उड्डाणपुलावर मुंबईच्या दिशेने जाणाNया मार्गिकेच्या कडेला नादुरुस्त ट्रक उभा होता. यावेळी पाठीमागून येणाऱ्या वॅगनर कारचालकाने अर्जंट ब्रेक मारला. त्यामुळे ओव्हरटेक करणाऱ्या एकूण सहा गाड्या एकमेकांवर आदळल्या. यामध्ये एक ट्रक आणि एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसचाही समावेश आहे. या भीषण अपघातात वॅगनरमधील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर वाहनांमधील सहा प्रवासी जखमी झाले. या जखमींवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
क्रेनच्या मदतीने वाहने हटवली
सकाळच्या सत्रात हा अपघात झाल्याने महामार्गावर प्रचंड कोंडी झाली होती. व्रेâनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनांना हटवण्यात आले. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. यावेळी वॅगनरमधील जखमी व मृत प्रवाशाला बाहेर काढण्यासाठी कटरने दरवाजे कापण्यात आले. त्यानंतरच जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले.






























































