
स्मशानभूमीमध्ये अल्पवयीन मुलीच्या मांडीवर कोंबडा ठेवून पूजा करण्याच्या अघोरी प्रकारात सामील असल्याप्रकरणी मांत्रिकासह पाचजणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये मांत्रिक राहुल लक्ष्मण चांदणे, केसर लक्ष्मण चांदणे (रा. रामटेकडी, हडपसर, पुणे) यांचा समावेश आहे. जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
वाई तालुक्यातील सुरूर येथील स्मशानभूमीत एका अल्पवयीन मुलीच्या मांडीवर कोंबडा ठेवून एक मांत्रिक मंत्रतंत्र – पूजाअर्चा करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे हा अघोरी प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे वाई तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणी मांत्रिकासह इतरांवर अंधश्रद्धानिर्मूलन कायद्याअंतर्गत भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण अतिशय गंभीरपणे घेत पोलिसांनी मांत्रिकासह पाचजणांच्या मुसक्या आवळल्या.




























































