लवकर सेवानिवृत्त होत आरामात जगायचेय; अशी करा गुंतवणूक…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लवकर सेवानिवृत्त होऊन आरामात जगण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, सेवानिवृत्ती घेतल्यानंतर आरामात जगण्यासाठी पैशांची गुंतवणूक असणे गरजेचे असते. अन्यथा सेवानिवृत्तीनंतर आरामात जगताना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे लवकर सेवानिवृत्ती घेण्याचा विचार असल्यास त्यादृष्टीने आर्थिक नियोजन करणे गरजेचे असते.

कोणत्याही वेळेच्या बंधनात न अडकता, कसलीही बंधने नसावी, यासाठी लवकर सेवानिवृत्ती घेत आरामात जगण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, लवकर सेवानिवृत्ती घेताना उर्वरीत आयुष्य कोणत्याही आर्थिक संकटाशिवाय आरामात जगता येईल, अशाप्रकारे गुंतवणूक करणे गरजेचे असते.

लवकर निवृत्ती घेण्याची योजना असल्यास 20 ते 30 वयादरम्यान आर्थिक नियोजन करणे योग्य ठरते. असे नियोजन करताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे खर्चांवर नियंत्रण ठेवणे. होणाऱ्या खर्चाची नोंद करत अनावश्यक खर्च कमी करण्यावर भर द्यावा. तसेच खर्च करण्याआधी गुंतवणुकीसाठी पैसे वेगळे ठेवत उरलेल्या पैशातूनच खर्च भागवावा. पगारवाढ झाली तरी खर्च न वाढवता गुतंवणूक वाढवण्यावर भर द्यावा. अशा प्रकारे दर महिन्याला ठराविक गुंतवणूक केल्यास काही वर्षात समाधानकारक पैसा उभारता येऊ शकतो.

पगार आणि जीवनशैली यांच्यात आर्थिक समन्वय ठेवावा. उत्पन्नापेक्षा जास्त खर्च केल्यास कर्ज आणि परतफेडीच्या चक्रात अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे कर्ज असल्यास किंवा क्रेडिट कार्डचे कर्ज परतफेड करण्यावर भर द्यावा. तसेच कोणत्याही परिस्थितीत गुंतवणूकीकडे दुर्लक्ष करू नये.

सेवानिवृत्ती लवकर घ्यायची असेल तर दीर्घ कालावधीच्या गुतंवणुकीसोबत कमी कालावधीच्या गुंतवणुकीकडेी लक्ष द्यावे. त्यामुळे काही वर्षात पगारातील पैसे गुंतवणुक वाढवण्यासाठी वापरता येऊ शकतात. कमी कालावधीची गुंतवणूक तुमची दीर्घ कालावधीची गुंतवणूक वाढवण्यास मदत करू शकते. या गुंतवणुकीतून लवकर सेवानिवृत्ती घेत उर्वरीत आयुष्य आरामात जगता येऊ शकते.

देशात सध्या आर्थिक सजगता वाढत आहे. आर्थिक सजगता असल्यास आपले पैसे योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेता येतो. पैसे वाचवण्यासोबतच ते वाढवण्यावरही भर देणे गरजेचे आहे. त्यासाठी आर्थिक सजगता गरजेची आहे.

तरूण वयात जोखमीची गुंतवणूक करण्याची योग्य संधी असते. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसोबतच काही ठराविक रक्कम जोखमीच्या फंडातही गुंतवता येते. त्यासाठी योग्य अभ्यास असणे गरजेचे आहे. कोणतीही गुंतवणूक करताना आरले दररोजचे आर्थिक गणीत बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच सर्व रक्कम एकाच योजनेत किंवा एकाट ठिकाणी न गुंतवता एसआयपी, पीपीएफ, बँक, पोस्ट यांच्या मदत ठेवी अशा विविध ठिकाणी गुंतवणूक करावी. अशा प्रकारे गुंतवणूक केल्यास काही वर्षात लवकर सेवानिवृत्ती घेत निवृत्तीनंतर आरामात जगता येऊ शकते.