
सामना ऑनलाईन । हैदराबाद
तेलंगानातील वारंगल जिल्ह्यातील एका फटाक्याच्या कारखान्याला मोठी आग लागली आहे. या आगीमध्ये ११ लोकांचा कोळसा झाला असून अनेक जण गोदामामध्ये अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आगीची माहिती मिळतात अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
#SpotVisuals: 10 people dead in fire at a firecracker godown near Koti Lingala Temple, 4 fire tenders present at the spot: Collector, Warangal District pic.twitter.com/Oj5rYsJtoO
— ANI (@ANI) July 4, 2018
वारंगल जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध कोटी लिंगाला मंदिराजवळ असलेल्या फटाक्याच्या कारखान्याला ही आग लागली असून यात ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले असून त्यांनी जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. या फटाक्याच्या कारखान्यामध्ये एकूण २५ कामगार काम करत होते. अद्याप बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळतात प्रशासनाने घटनास्थळी तात्काळ मदत पोहोचवली आहे. आजूबाजूच्या भागातील लोकांना गोदामापासून लांब राहण्याची ताकिद देण्यात आली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग नक्की कशामुळे लागली यामागील कारणांचा तपास सुरू असून फटाके बनवण्याच्या एखाद्या विस्फोटक पदार्थाचा स्फोट होऊन ही आग भडकली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.



























































