
महापालिका निवडणुकांचे काउंटडाऊन सुरू झाले असून ठाणे जिह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि पालघर जिह्यातील वसई-विरार महापालिकेची प्रभाग रचना उद्या जाहीर होणार आहे.
ठाणे महापालिकेची निवडणूक 2017मध्ये चार प्रभागांच्या पॅनलमध्ये झाली होती. तर अन्य तिन्ही पालिकांच्या निवडणुका प्रभागानुसार झाल्या होत्या. प्रभागांची संख्या वाढल्यामुळे कोणाचा प्रभाग तुटणार, कोणाचा प्रभाग कोणत्या पॅनलमध्ये येणार याबाबत सर्वच इच्छुक उमेदवारांना लागलेली उत्सुकता उद्या संपणार आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर येत्या 14 फेब्रुवारीपर्यंत सूचना आणि हरकती घेण्यात येणार आहेत. त्यानंतर 26 फेब्रुवारीपर्यंत हरकतींवर सुनावणी होणार आहे. सुनावणीनंतर 2 मार्च रोजी प्रभाग रचना आयोगाला पाठविण्यात येणार आहे. वसई-विरार महापालिकेत प्रभागांची संख्या 126 केली आहे.
- लोकसंख्येच्या तुलनेत या चारही महापालिकांमध्ये प्रभागांच्या संख्येत वाढ केली आहे. यंदाची निवडणूक ही पॅनल पद्धतीमध्ये पार पडणार आहे. तीन प्रभागांचे एक पॅनल असेल.
नव्या रचनेत पुणे महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 173 होणार
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीचा बहुप्रतिक्षित प्रभागरचनेचा आराखडा 1 फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार आहे. नव्या रचनेत तीन सदस्यांचे 57 प्रभाग आणि दोन सदस्यांचा एक असे मिळून 58 प्रभाग असणार असून महानगर पालिकेतील एकूण नगरसेवकांची संख्या 173 होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पुणे महापालिकेच्या नव्या प्रभार रचनेचा आराखडा महापालिकेकडून प्रसिद्ध केला जाईल. यावर हरकती व सुचना नोंदविण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या हरकतींवर सुनावणी घेऊन 2 मार्च रोजी प्राधिकृत अधिकाऱयांच्या शिफारशींसह निवडणुकीसाठीचा अंतिम आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे.

































































