‘माऊलीं’च्या दिंडीत होणार पत्रावळीवर पंगती, वारकऱ्यांनी केले प्लास्टिक बंदीचे स्वागत

63

सामना प्रतिनिधी । पैठण

‘माऊली’ जन्मक्षेत्र, आपेगाव (ता.पैठण) येथून पंढरपूरकडे जाणाऱ्या पायी दिंडी सोहळय़ातील वारकऱ्यांनी ‘प्लास्टिक बंदी’चे तंतोतंत पालन करावे. विशेषतः पालखी मार्गावरील अन्नदात्यांनी याबाबत खबरदारी घ्यावी. नैसर्गिक द्रोण – पत्रावळीचाच वापर करावा. अशा कडक सूचना देण्यात आल्या आहेत. एवढेच नव्हे तर पालखी सोहळ्यासोबत एका स्वतंत्र ट्रकमध्ये दीड लाख द्रोण-पत्रावळी घेण्यात येणार आहेत, अशी माहिती पालखी सोहळाप्रमुख ह.भ.प. ज्ञानेश्वर विष्णू महाराज कोल्हापूरकर यांनी दै. ‘सामना’शी बोलताना दिली.

४ जुलै रोजी या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. संतसम्राट ज्ञानेश्वर महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र आपेगाव (ता.पैठण) येथून पंढरपूरकडे जाणाऱया या आषाढी दिंडी सोहळ्याला ८०० वर्षांची परंपरा आहे. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी प्लास्टिक बंदी केल्याच्या पार्श्वभूमीवर यंदा या सोहळ्याची वेगळ्या पध्दतीने तयारी करण्यात येत आहे. ‘माऊलीं’च्या या पालखी सोबत १८ दिवस पायी चालणाऱ्या जवळपास ५ हजार वारकऱयांसाठी गावागावातील अन्नदाते २ वेळच्या भोजनाची व्यवस्था करतात. किमान ३ महिने अगोदरच अन्नदाते व पालखी सोहळा यंत्रणा यांच्यात याबाबत नियोजन केले जाते. तसेच ‘माऊली’च्या पालखी सोबतच स्वंयपाकी व शिधासामग्रीची उपलब्धता असतेच, अशी माहिती पालखी सोहळाप्रमुख ज्ञानेश्वर विष्णू महाराज कोल्हापूरकर यांनी दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे नैसर्गिक पत्रावळी-द्रोण तयार केल्या जातात. १५ वर्षांपूर्वी शेकडो दिंडय़ांना येथूनच पत्रावळींचा पुरवठा होत होता. येथूनच प्रत्येकी दीड लाख पत्रावळी व द्रोण आम्ही मागवले आहेत. माऊली दिंडीतील ५ हजार वारकऱ्यांच्या सलग १८ दिवस २ वेळा उठणाऱ्या पंगतीचा हिशेब लावून दीड लाख पत्रावळींची ऑर्डर दिली आहे. दिंडीसोबत स्वतंत्र ट्रकमध्ये हे साहित्य आम्ही घेऊन जाणार आहोत, असेही ह.भ.प. ज्ञानेश्वर विष्णू महाराज कोल्हापूरकर यांनी स्पष्ट केले. ‘युज अँड थ्रो’ संस्पृतीमुळे हे कारखाने डबघाईला आले होते.

दरम्यान, यावर्षी प्रथमच भोजनाच्या पंगतींचे नियोजन करण्यासाठी दिंडी सोहळा यंत्रणेला स्वतंत्र बैठक घ्यावी लागली. संतसम्राट ज्ञानेश्वर महाराज दिंडी पालखी उत्सव उपप्रमुख ह.भ.प. भानुदास ज्ञानेश्वर महाराज यांनी घेतलेल्या या बैठकीत प्लास्टिक बंदी कायद्याच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. बैठकीत १८ मुक्कामी गावांतील अन्नदात्यांना सूचना देण्यात आल्या. त्यानुसार प्रत्येक पंगत ही प्लॉस्टिक साहित्य विरहित असावी. नैसर्गिक पत्रावळींसह द्रोण व ग्लास यांचा वापर करतानाही याचे भान ठेवावी, असे सांगण्यात आले. या दिंडीत दरवर्षी किमान ५ हजार महिला-पुरुष वारकरी सहभागी होतात.

प्लास्टिक बंदीचे वारकऱ्यांनी केले स्वागत

ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की, शिवसेना नेते तथा युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केलेल्या प्लास्टिक बंदीमुळे निसर्गाचा होणारा ऱहास कमी होणार आहे. तुकाराम महाराजांनी सांगितले आहे की, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी… वनचरी !’. त्यामुळे वारकरी संप्रदायाने या निर्णयाचे स्वागत केले असून, आम्ही शिवसेनेचे आभार मानतो. दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून समस्त वारकरी हे स्वपृतीतून जनजागृती करणार आहेत, असेही कोल्हापूरकर महाराज यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या