कोरोनाविरुद्धच्या युद्धात प्राण गमावलेल्या योद्धय़ांच्या नातेवाईकांना केंद्राचा ठेंगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना रोखण्यासाठी काम करताना जीव गमावणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने 50 लाखांची मदत देण्याचे जाहीर केले. मात्र पालिकेने पाठवलेल्या 169 प्रस्तावांपैकी तब्बल 93 प्रस्ताव निकषात बसत नसल्याचे सांगत केंद्राने अपात्र ठरवून नाकारले आहेत. केंद्राने आतापर्यंत केवळ 17 कर्मंचाऱ्यांना 50 लाखांची मदत केली आहे. मात्र कोरोनासंबंधित कोणतेही काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची जबाबदारी पालिकेने घेतली असून आतापर्यंत 54 जणांना 50 लाखांची मदत केली असून 46 जणांच्या कुटुंबातील एकाला नोकरीही दिली आहे. कोरोनामुळे पालिकेच्या 197 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर काही दिवसांतच वेगाने प्रसार झाला. मात्र पालिकेच्या हजारो कर्मचाऱ्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता मुंबईकरांच्या रक्षणासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केले. यामध्ये आतापर्यंत पालिकेच्या तब्बल 197 कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. केंद्र सरकारने कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांची आर्थिन नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले होते. यानुसार पालिकेनेही 50 लाखांची मदत आणि कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे जाहीर केले होते. यानुसार पालिकेने  197 मृतांपैकी 169 प्रस्ताव आतापर्यंत केंद्राकडे पाठवले होते. दरम्यान, उर्वरित मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत आणि कुटुंबातील एकाला नोकरी देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

निकषात बसत नसल्याचे कारण

केंद्राने जाहीर केल्यानुसार पालिकेने प्रस्ताव पाठवले. मात्र यातील 93 प्रस्ताव ‘प्रत्यक्ष’ कोविड काम करीत असल्याचा निकष पूर्ण करीत नसल्यामुळे  परत पाठवले असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्याने दिली. केंद्राच्या या भूमिकेविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

 प्रत्यक्ष कोविड सेंटर किंवा रुग्णालयात काम करीत नसले तरी जनतेसाठी कोविड काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा संबंधित विभाग-कर्मचाऱ्यांशी अनेक वेळा संबंध येतो. सेवा बजावत असतानाच त्यांना कोरोनाची लागण  होते. त्यामुळे केंद्राच्या पात्रतेच्या निकषांवर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

साडेपाच हजार जण कोरोनाला हरवून पुन्हा कामावर

कोरोना लढय़ात काम करताना पालिकेच्या सुमारे सवा लाख कर्मचाऱ्यांपैकी 6087 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. यातील 197 कर्मचाऱ्यांना कोरानामुळे जीवही गमवावा लागला. मात्र 5 हजार 58 कर्मचारी कोरोनाला हरवून पुन्हा कामावर हजर झाले. तर 832 कर्मचारी अजूनही कोरोनाबाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली.