
सामना ऑनलाईन। वॉशिंग्टन
अमेरिकेने इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ऍथलेटिक्स (आयएएएफ) वर्ल्ड रिले स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. या स्पर्धेत ऍथलेटिक्सच्या इतिहासात प्रथमच मिश्र अडथळा रिले शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यजमान अमेरिकेने मिश्र अडथळा रिले आणि 2 बाय 2 बाय 400 मीटर रिले शर्यतीत सोनेरी यश संपादन केले.
स्पर्धेतील मिश्र अडथळा रिले शर्यत अतिशय थरारक झाली. दोन्ही हिटस्मध्ये एकूण 7 संघ होते. अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया व जमैका या चार संघांनी अंतिम फेरीत धडक दिली होता, मात्र पदके फक्त दोन संघांनाच देण्यात आली. अमेरिकेने सुवर्णपदक जिंकले, तर जपानला रौप्यपदक मिळाले. ऑस्ट्रेलियाचा संघ डिस्क्वॉलिफाय झाला, तर जमैकाने शर्यतीची सुरुवातच केली नाही. अमेरिका संघाने 54.96 सेकंद वेळेसह ही शर्यत जिंकली. जपानला 55.59 सेकंद वेळेसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. शनिवारी झालेल्या 2 बाय 2 बाय 400 मीटर शर्यतीतही अमेरिकेनेच बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने रौप्य, तर जपानने कास्यपदकाची कमाई केली.
मिश्र अडथळा रिले शर्यतीत एका संघात दोन महिला आणि दोन पुरुष धावपटू असतात. सर्वप्रथम पुरुष धावपटू 110 मीटर शर्यत धावून बॅटन महिला धावपटूकडे देतो. मग महिला धावपटू दुसऱया पुरुष धावपटूकडे बॅटन सुपूर्द करते. शेवटी पुरुष धावपटू शर्यत पूर्ण करतो असे मिश्र अडथळा शर्यतीचे स्वरूप असते.
































































