खेड तालुक्याला पाणी टंचाईच्या झळा; हंडाभर पाण्यासाठी करावी लागतेय पायपीट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाचा कडका सुरु होताच तालुक्याला पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावू लागला असून हंडाभर पाण्यासाठी ग्रामीण जनतेला विशेषकरून धनगरवाड्यांवरील महिलांना पाण्यासाठी मैलोंमैलाची पायपीट करावी लागत आहे. काही ठिकाणी सार्वजनिक पाणवठ्यावर महिलांना पाण्यासाठी रात्र काढावी लागत आहे. एवढे करूनही पाणी मिळेल याची शाश्वती नसल्याने काही गावतील ग्रामस्थांना केवळ प्रशासनाकडून पुरविल्या जाणाऱ्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहेत. सध्या खेड तालुक्यातील 5 गावातील 8 वाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून येथील ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण करत आहेत.

खेड तालुका हा पाणी टंचाईच्या यादीत सगळ्यात वरच्या क्रमांकावर असलेला तालुका, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच या तालुक्यात पाणी टंचाईची समस्या सुरू होते. सुरुवातीला तालूक्याच्या अतिदुर्गम भागात असलेल्या धनगरवाड्यांवर पाणी टंचाईला सुरवात होते. हळूहळू पाणी टंचाईचा वणवा अर्ध्याधिक तालुक्यात पसरतो आणि ग्रामस्थांवर पाण्याची वणवण करण्याची वेळ येते. गेली अनेक वर्षे हे सुरूच आहे. पाणी टंचाई सुरु झाली की प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा करून टंचाईग्रस्त गावांची तहान भागवली जाते. मात्र, टँकर हा पर्याय कायमस्वरूपी नसल्याने वर्षानूवर्ष तालुक्याला लागलेले पाणी टंचाईचे ग्रहण सुटलेले नाही.

दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरु होणारी पाणी टंचाई पाऊस पडेपर्यंत टंचाईग्रस्त ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पळवते. टंचाईग्रस्त ग्रामस्थांना टँकरच्या पाण्याशिवाय पर्याय उरत नाही. परंतु टँकरद्वारे पाणी पुरवठा करताना प्रशासनाला मर्यादा येत असल्याने टंचाईग्रस्त वाड्यांमध्ये पाण्यासाठी फिरावे लागते. टंचाईच्या काळात पाळीव जनावरांची अवस्था तर अतिशय वाईट असते. जिथे माणसांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही तिथे जनावरांसाठी कुठून पाणी कुठून मिळणार अशी परिस्थिती निर्माण होते. एप्रिल आणि मे महिन्यांदरम्यांन निर्माण होणाऱ्या या परिस्थितीमुळे टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांवर कुटुंबासह पाण्याचा आसरा असलेल्या ठिकाणी स्थलांतरित होण्याची वेळ येते.

दरवर्षी पावसाळ्यात कोसळणाऱ्या पावसाचे प्रमाण जास्त आहे. पावसाळ्यात एकदातरी नारिंगी आणि जगबुडी नदीला पूर येऊन खेड शहर पाण्याखाली जाते. पावसाळ्यात पडणारे पाणी अडविण्याचा दृष्टीने योग्य नियोजन झाले असते तर तालुक्याला पाणी टंचाईच्या झळा कमी बसल्या असत्या.

सद्यस्थितीत तालुक्यात 5 गावातील आठ वाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने खोपी तिसंगी आणि खवटी धनगरवाड्यांचा समावेश आहे ऐनवली आणि पोसरे या दोन गावांमध्येही पाणी टंचाई निर्माण झाली असून या दोन गावांना सध्या टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. खोपी, तिसंगी आणि खवटी धनगरवाद्यांवरील ग्रामस्थांनी टँकरद्वारे पाणी पुरवठा व्हावा यासाठी पंचायत समितीच्या पाणी नियोजन विभागाकडे अर्ज दाखल केला आहे मात्र येथील ग्रामस्थ अद्याप टँकरच्या प्रतीक्षेत आहेत.