
शीळ धरणातील जॅकवेल कोसळल्यानंतर रत्नागिरी शहरावर पाणी संकट ओढावले आहे. गेले पाच दिवस रत्नागिरीकर पाण्यापासून वंचित आहेत.त्यामुळे नागरिकांमधून संताप उमटत आहे. किल्ला परिसरातील अनेक नागरिक हंडा मोर्चा घेऊन पालिकेवर धडकले. पाणी द्या, पाणी द्या, मुख्याधिकारी हाय हाय, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. नगर परिषदेच्या गणपतीचे विसर्जन होणार होते. त्यापूर्वीच नागरिकाने गणरायाला पाण्यासाठी साकडे घातले.
घरात गणपती बाप्पा आणि घरात पाण्याचा थेंब नाही अशी रत्नागिरीकरांची अवस्था झाली आहे. शीळ येथील जॅकवेल कोसळल्यानंतर अजूनही रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीतच आहे. सलग पाच दिवस पाणी न आल्यामुळे किल्ला येथील नागरिक बाबू तळेकर यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महिला पुरुष हंडामोर्चा घेऊन नगर परिषदेवर धडकले. तेथे घोषणाबाजी केल्यानंतर सर्वांनी गणरायाचे दर्शन घेऊन तेथेच ठिय्या दिला. गणरायाकडे पाणीटंचाईचे संकट दूर कर असे साकडेही घातले.रत्नागिरीत पाणीबाणी सुरू आहे. शीळ धरणातील जॅकवेल कोसळल्यानंतर पानवल धरणातून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असला तरी तो पाणी पुरवठा अनियमित आणि अल्प प्रमाणात आहे.