
सामना प्रतिनिधी । देवणी
देवणी तालुक्यातील नागराळ येथे जलक्रांतीच्या ध्यासाने अख्खा गाव झपाटला आहे. या जलक्रांतीची सुरुवात महिलांनीही तेवढ्याच उत्स्फूर्तपणे करीत प्रत्येक घराला चळवळीत सामील करण्यासाठी गावातील सासू सुनांना आमंत्रित करण्यात आले. हाती घेतलेल्या कामास गती मिळावी म्हणून महिलांनी गावातील प्रत्येक घरातील सासू सुनेच्या जोडीला कुंकू लावले. हलगीच्या निनादात हातावर साखर देऊन आमंत्रण दिले आणि उपस्थित सासू सुनांचे पाय धुवून त्यांना सन्मानीत करण्यात आले.
सर्व नागराळकर टिम, ‘तुफान सेना’ तसेच गावातील अबाल वृद्धांनी गुरूवारी पुन्हा भल्या पहाटे श्रमदानास सुरुवात केली. साधारण तीनशे ते साडेतीनशे उंबरे असलेले नागराळ गाव असून गावाच्या पूर्वेस उत्तरेस मोठा डोंगर असून मुख्य उपजिवीका शेतीवर अवलंबून असलेलं गाव निसर्गाच्या अवकृपेनं मात्र गांजलेलं आहे. ‘पाणी फाऊंडेशन’चे राजेंद्र जाधव, तहसिलदार सुरेश घोळवे, गावचे सरपंच, उपसरपंच माजी जि.प. सदस्य दिलीप पाटील नागराळकर या मंडळींनी गावातील लहान विद्यार्थ्यांपासून ‘तुफान सेना’ नावाची टिम तयार केली. जनजागृती करून गावात पडणारी प्रत्येक थेंब जमिनीत मुरवण्याचा ध्यास घेतला आहे. गावासह शिवारात बांधबंदीस्ती नालासरळीकरण गावात घर तिथे शोषखड्डा ही मोहीम राबवली आहे.
गावातील सासू सुनांना हळद कुंकू लावून आणि हातावर साखर ठेऊन सर्वांना जल चळवळीच्या प्रवाहात आणले. यातूनच ८४ सासू सुनांच्या जोडीला आमंत्रण देऊन १६८ महिलांना या प्रवाहात आणल्याने गावकरीही या वॉटरकप स्पर्धेत हिरहिरीने सामील झाले. नागराळ गावाने सुरू केलेला हा उपक्रम देवणी तालुक्यात आदर्श ठरला आहे.



























































