
सामना प्रतिनिधी । गारगोटी
सह्याद्रीच्या पश्चिम घाटमाथ्यावर अडीच ते तीन हजार फुट उंचीवरून कोसळणाऱ्या भुदरगड तालुक्यातील शिवडाव नाईकवाडीच्या सुमारे दहा ते बारा धबधब्यांची माळ म्हणजे निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे. वर्षा पर्यटकांना हे धबधबे म्हणजे पर्वणीच आहे.
हे धबधबे डोळ्यांचे पारणे फेडतात. पश्चिम घाटमाथ्यावरून रोरावत खाली दरीत कोसळणाऱ्या धबधब्यांचे समोरील कड्यावरून होणारे दर्शन तहानभूक हरवून सोडते. बिरोबाच्या माळाकडून दोन धबधबे प्रचंड उंचीवरून कोसळत मध्येच एका कड्यावर बेमालूमपणे एकमेकात मिसळतात. या धबधब्यांचा अद्भुत संगम भारावून टाकतो. अशा प्रकारचा दोन धबधब्यांचा संगम जगात कुठेही नसल्याने हे पर्यटन स्थळ वेगळीच अनुभूती देते. या धबधब्यांची तुलना कर्नाटकच्या गिरसप्पा, जोग फॉल्सच्या धबधब्याशी केली जाते. हे अनोखे धबधबे आणि परिसरातील सह्याद्रीच्या रांगा व खोल दऱ्याखोऱ्यांचे विलोभनीय दृष्य हे महाबळेश्वरलाही लाजवणारे आहे.
पर्यटकांनी या धबधब्यांचा मनमुराद आस्वाद घ्यावा, असे आवाहन मुरगुडचे जेष्ट शिल्पकार एम. डी. रावण यांनी केले आहे.
गारगोटीपासून अवघ्या ३५ कि.मीटरवरील हे ठिकाण वन विभागाने पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित केल्यास हा परिसर भुदरगडच्याच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्याच्या पावसाळी पर्यटनाची उंची वाढवणारा आहे. त्या दृष्टीने लोकप्रतिनिधींनी या परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याची मागणी पुढे येत आहे .






























































