कोयना धरणातून विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फूट सहा इंच उघडण्यात आले असून, त्याद्वारे आज सकाळी 11 वाजता 3400 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. तसेच कोयना धरण पायथ्यावरील विद्युतगृहातील दोन्ही युनिट सुरू असून, त्याद्वारे 2100 क्युसेक विसर्ग सुरू आहे. एकूण 5500 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडले जात आहे.

धरण क्षेत्रात मागील काही दिवसांपासून सतत होत असलेल्या जोरदार पावसामुळे पाणीसाठा झपाट्य़ाने वाढत आहे. यामुळे धरण प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून नियोजित विसर्ग सुरू केला आहे.

कोयना नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी सुरक्षित अंतरावर राहावे, नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्थानिक प्रशासन, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा दक्ष अवस्थेत असून, परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. नदीकाठच्या गावांमध्ये ग्रामपंचायती व तलाठी यांच्या माध्यमातून सतर्कतेचा संदेश पोहोचविण्यात येत आहे. दरम्यान, नागरिकांनी कोणतीही अफवा न पसरवता, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासांत कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोयनानगरला 103 मि.मी., नवजाला 134, तर महाबळेश्वरला 92 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा 75.48 टीएमसी झाला असून धरण 71.71 टक्के भरले आहे.

दरम्यान, कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील पावसामुळे धरणाची पाणीपातळी पाणीसाठा नियंत्रण सूचीनुसार नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी साडेबारा वाजता धरण पायथा विद्युतगृहाचे जनित्र सुरू करून 500 क्युसेक विसर्ग वेण्णा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.