
सामना प्रतिनिधी । लातूर
केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय जलपारितोषिक 2018 मध्ये लातूर जिल्ह्याने बाजी मारली आहे. सर्वोत्तम जिल्हा म्हणून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना नदी, जलसंधारण श्रेणीत प्रथम पुरस्कार व तसेच जाऊ ता. निलंगा येथील अनुसूचित जातीच्या मुलींची शासकीय निवासी शाळेस जलसंधारणाच्या कामामध्ये सर्वोत्तम शाळा पुरस्कार जाहीर करण्यात आला. केंद्र सरकारच्या जलसंसाधन, नदी विकास मंत्रालय यांचेकडून दरवर्षी राष्ट्रीय जलपारितोषिक देण्यात येते. लातूर जिल्ह्यास प्रथमच हा पुरस्कार मिळाला आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या कारकिर्दीत तसेच मागील दोन वर्षात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली आहेत.
राष्ट्रीय जलपारितोषिक 2018 मध्ये सर्वोत्तम जिल्हा नदी व जलसंधारण श्रेणीसाठी पारितोषिक व सन्मानचिन्ह तसेच जलसंधारणात सर्वोत्तम शाळेस पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि दीड लाख रुपये रक्कम असा पुरस्काराचे स्वरूप आहे.राष्ट्रीय जलपुरस्कार 25 फेब्रुवारीला नवी दिल्ली येथे केंद्रीय जलसंधारणमंत्री, नदी विकास, गंगा संरक्षण व इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. राष्ट्रीय जलपारितोषिक 2018 मध्ये लातूर जिल्ह्यास दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. जिल्ह्यात झालेल्या जलसंधारण तसेच नदी विकासाच्या कामात संबंधित प्रशासकीय विभाग, लोकप्रतिनिधी, अशासकीय संस्था, नागरिक यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली असून विशेष करून दुष्काळ कालावधीत मांजरा नदी खोलीकरण व रुंदीकरण कामात पूर्ण लातूरवासियांनी लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात कार्य केले आहे. हा राष्ट्रीय जलपुरस्कार लातूर जिल्ह्यास मिळणे जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, साकेब उस्मानी यांनी यासाठी औपचारिक कामकाजात विशेष परिश्रम घेतले.
जाऊ ता. निलंगा येथील अनुसूचित जातीच्या मुलींची शासकीय निवासी शाळेत अभ्यासक्रमासोबतच जलसंधारण, नाविन्यपूर्ण कल्पना राबविण्यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली तसेच सहाय्यक आयुक्त समाजकल्याण बी.जी. अरावत, प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण विभाग दिलीपकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय मुखाम व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन परिश्रम घेतले. केंद्र शासनाचा राष्ट्रीय जलपारितोषक जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सर्व लातूर जिल्हावासियांचे आभार व्यक्त केले.



























































