भूजल पातळीत होणार आणखी घट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । नगर

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने मे महिन्यातील भूजल पातळी पाहणीचे काम सुरू केले आहे. ही पाहणी करताना ज्या 202 निरीक्षण विहिरींची तपासणी करण्यात येते, त्यापैकी तब्बल 35 विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. त्यामुळे मे महिन्यातील भूजल पातळीत मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट आढळण्याचा अंदाज या विभागाने व्यक्त केला आहे.

एका वर्षात किमान जानेवारी, मार्च, मे आणि सप्टेंबर, ऑक्टोबर अशा महिन्यांमध्ये भूजल पातळीची पाहणी केली जाते. ती करण्यासाठी जिल्ह्यातील 202 विहिरी निश्‍चित करण्यात आल्या आहेत. भूजल पातळीची पाहणी केल्यानंतर तिची तुलना मागील पाच वर्षांच्या सरासरी भूजल पातळीशी करण्यात येते. त्यावरून कोणत्या तालुक्यातील गावांमध्ये कोणत्या महिन्यापासून पाण्याची टंचाई जाणवू शकते, तालुक्यातील भूजल पातळीमध्ये किती घट किंवा वाढ झाली आहे, भविष्यात त्याचे काय परिणाम होऊ शकतात, याचा अंदाज या विभागाकडून सांगण्यात येतो.

या विभागाने सप्टेंबर 2018 मध्ये भूजल पातळीची पाहणी केल्यानंतर जून 2019 पर्यंत जिल्ह्यातील 868 गावांमध्ये पाण्याची टंचाई जाणवण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार दिवसेंदिवस टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत असून, अशा गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यातच आता मे महिन्यातील भूजल पातळीची पाहणी करताना बहुतांश निरीक्षण विहिरी या कोरड्याठाक पडल्याच्या आढळत आहेत. त्यामुळे या महिन्यात भूजल पातळीत गेल्या पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट होणार असल्याचा अंदाज या विभागाने व्यक्त केला आहे.

मार्च महिन्यात सर्वच तालुक्यांत घट
मार्च 2019 मध्ये केलेल्या पाहणीनुसार अकोला, जामखेड, कर्जत, कोपरगाव, नगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, राहाता, राहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, श्रीरामपूर या सर्वच तालुक्यांमध्ये भूजल पातळीत मागील पाच वर्षांमधील सरासरी भूजल पातळीपेक्षा घट झाल्याचे आढळले होते. जून 2018 ते ऑक्टोबर 2018 या काळात जिल्ह्यात सरासरी 70 टक्के पाऊस पडला. पावसाची ही टक्केवारी सरासरीच्या तुलनेत खूपच कमी असल्यामुळे मार्च महिन्यात भूजल पातळीत अधिकच घट झाल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाने स्पष्ट केले होते. त्यामुळे यंदा पावसाने सरासरी न गाठल्यास भूजल संकट अधिकच गडद होऊ शकते.

202 विहिरींचे केले जाते निरीक्षण
भूजल पातळीची पाहणी करताना भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वतीने 202 विहिरींचे निरीक्षण केले जाते. यामध्ये नगर तालुक्यातील 20, पारनेर तालुक्यातील 15, पाथर्डी 8, शेवगाव 18, श्रीरामपूर 12, राहुरी 14, नेवासा 12, कर्जत 15, जामखेड 11, श्रीगोंदा 18, संगमनेर 26, अकोला 13, कोपरागव 15 व राहाता तालुक्यातील पाच विहिरींचा समावेश आहे.