चंद्रावर पाण्याचे रेणू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

नासाच्या वैज्ञानिकांनी चंद्रावर पाण्याचे रेणू सापडल्याचा दावा केला आहे. चंद्राच्या प्रकाशित भागात हे पाण्याचे रेणू सापडले आहेत. आगामी चांद्रमोहिमांसाठी या पाण्याचा संशोधनात उपयोग होऊ शकणार आहे.

ल्युनर रेकनसान्स ऑर्बिटर (एलआरओ) या अवकाशयानाच्या मदतीने नासाच्या वैज्ञानिकांनी हे संशोधन केले आहे. अवकाशयानावर लावलेल्या लायमन अल्फा मॅपिंग प्रोजेक्ट या उपकरणाने चंद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याच्या कणांचा थर टिपला आहे. गेल्या दशकापर्यंत चंद्र कोरडा असून तेथील अंधाऱ्या भागातील विवरात मुख्यतः ध्रुवीय प्रदेशात पाणी असल्याचे वैज्ञानिकांच्या संशोधनात उघड झाले होते. मात्र अलीकडच्या संशोधनात चंद्राच्या पृष्ठभागावर जेथे प्रकाश आहे तेथे पाण्याचे थर शोधून काढले आहेत. पाण्याचे रेणू चंद्रावरील मातीला चिकटलेले आहेत. चंद्र जसा तापत जातो तसे हे पाणी वरच्या भागातून खाली येते.