
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांना लागून जॉगिंग आणि सायकल ट्रॅक तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. पालिकेच्या या ‘हरित वारी, जल तीरी’ उपक्रमात सुरक्षेच्या दृष्टीने होणाऱया कामातील साहित्याची तपासणी करणे, कामाबाबत दुरुस्ती व पुन्हा नवीन उपाययोजना सुचवणे यासाठी वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान (व्हीजेटीआय) संस्थेची नियुक्ती करण्यात येणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया जलवाहिन्यांच्या दुतर्फा असलेले अनधिकृत बांधकाम हटवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका कार्यवाही करीत असून दोन्ही बाजूस 10 मीटर अंतरावर संरक्षक भिंत बांधण्याचे काम पालिकेच्या जल विभागाच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे. भिंत बांधण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर जलवाहिन्यांच्या दुतर्फा असलेल्या मोकळ्या जागेवर मुंबईकरांसाठी सायकल व जॉगिंग ट्रक तयार करण्यात येणार आहे. मुंबईतील विविध भागांतून हा प्रकल्प राबवण्यात येत असून सायकल, जॉगिग ट्रक, ये-जा करण्यासाठी रस्ता, बगीचा व आकर्षक विद्युत रोषणाई ही सौंदर्यात भर टाकणारी कामे करण्यात येणार आहेत. या सगळ्या कामांची तपासणी करण्यासाठी व्हीजेटीआय संस्थेने होकार दिला आहे. या कामात पहिल्या टप्प्यातील सायकल ट्रकचे 125 कोटी रुपयांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तर त्रयस्थ लेखापरीक्षक म्हणून काम पाहण्यासाठी व्हीजेटीआय 31.25 लाख रुपये खर्च करणार आहे. आगामी स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.
पालिका क्षेत्रात 39 किलोमीटर लांबीची तानसा जलवाहिनी असून तिचा एक भाग मुलुंड-धारावी असून दुसरा भाग घाटकोपर-शीव असा आहे. ही जलवाहिनी पालिकेच्या टी, एस, एम पश्चिम, एन, एल, एफ उत्तर, के पूर्व, एच पूर्व, एच पश्चिम व जी उत्तर या 10 प्रशासकीय विभागातून जाते. यामध्ये मुलुंड, भांडुप, सहार, वाकोला, हुसेन टेकडी खार पूर्व, माहीम, धारावी, घाटकोपर, कुर्ला पूर्व, आणिक डेपो परिसरांचा समावेश होतो. पालिकेने सायकल ट्रकसाठी तानसा जलवाहिनीलगतच्या झोपडय़ा हटविण्याची कारवाई सुरू केली आहे.






























































