
सामना प्रतिनिधी । देवरुख
संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर बामणोली खोर्यातील डोंगरात वसलेल्या निवधे धनगरवाडीला राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत नळपाणी योजना करावी, या मागणीसाठी स्थानिक ग्रामस्थ आणि निवधे – मारळ ग्रुप ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी शासन स्तरावर वारंवार पाठपुरावा करुनही शासकीय स्तरावर दखल घेतली जात नसल्याने या वस्तीवरील ग्रामस्थांच्या तोंडचेच पाणी पळाल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
निवधे धनगरवाडी उंच ठिकाणी वसलेली असल्यामुळे येथे उन्हाळी हंगामात कोणताही पाण्याचा स्रोत नाही अशावेळी ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते वाडीतील महिलांना ४ ते ५ किलोमीटर पायपीट करून पाणी आणावे लागत आहे निवधे धनगरवाडी ची पाणी समस्या कायम संपवण्यासाठी नदी किनारी विहीरीवरुन नळपाणी पुरवठा योजना करुन पाणी पुरवठा करणे आवश्यक आहे येथील लोकसंख्या कमी असल्याने लोकसंख्या निकषा अभावी येथील ग्रामस्थ वंचित राहिले असून योजनेसाठी आवश्यक प्रस्तावाला विशेष बाब म्हणून मान्यता मिळवणे आवश्यक आहे एवढ्या वर्षातली पाण्याची भीषणता पाहता विशेष बाब म्हणून मान्यता मिळवून पाणी प्रश्न सोडवण्यास जिल्हा प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.
हिंदुस्थानात निवडणूका हा लोकशाहीचा उसत्व मानला जातो तर नागरिकांना मूलभूत समस्या सोडवून पाणी, वीज, रस्ता देने ही लोकप्रतिनिधींची कर्तव्य समजली जातात. मात्र निवधे धनगरवाडीतील धनगर समाज पाण्याने व्याकुळ झाल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे यंत्रणेकडून आपल्याला न्याय मिळत नसून शासकीय यंत्रणेबद्दल स्थानिकांच्या मनात तीव्र नाराजी उमटू लागली आहे. आगामी होऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानावर जाहीर बहिष्कार टाकणार असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले.





























































