छत्तीस तास वीज गायब; पैसे मोजूनही पाण्यासाठी वणवण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बोरी

बोरी व परिसरात बुधवारी सायंकाळी झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे केळीबागांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच आंबा, लिंब, बाभळीच्या झाडांचेही नुकसान झाले आहे. विजेचे खांब आणि तारा तुटल्याने सुमारे छत्तीस तास परिसरतील वीज गायब झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे संकट वाढले आहे. वीज नसल्याने पैसे मोजूनही पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे.

बोरी तांड्यावर अनेक घरावरील पत्रे उडून गेले. उडालेले पत्रे लागल्याने एकजण जखमी झाला आहे. बोरी, नागपूर, चांदज, पांगरी आदी भागात वादळी वाऱ्यामुळे केळी बागा आडव्या झाल्या आहेत. अनेक दुकानांचे बोर्ड, होर्डिंग यांचेही नुकसान झाले आहे. अगोदरच दुष्काळ त्यात रखरखत्या उन्हामुळे त्रस्त झालेला शेतकरी वीज नसल्याने अडचणीत सापडला आहे. सुमारे छत्तीस तास वीज नसल्याने पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. वीज नसल्याने पाणी असूनही पैसे मोजून रांगेत उभे राहून पाणी विकत घ्यायची वेळ नागरिकांवर आली आहे. नळाला आठ आठ दिवस पाणी नाही, बोरी ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या वॉटर एटीएम वीज गुल झाल्याने दोन दिवस बंद होते. बोरीतील आरो प्लांटच्या मालकांनी जनरेटर लावून नागरिकांना जास्तीचे पैसे घेऊन पाणी पुरवले. नेहमी दहा रुपयांना घरपोच दिले जाणारे साधे जारचे पाणी आरो प्लांटवरून 20 ते 30 रुपयांना नागरिकांनी घेतले. वाढत्या दराने जारचे पाणी विकत घेतल्याशिवाय नागरिकांसमोर दुसरा पर्यायच नव्हता. वीज वितरण कंपनीचे लाईनमन वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत होते. शुक्रवारी दुपारी दोन वाजता वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.