जलसंवर्धन आणि व्यवस्थापन

water-tab

>> अरुण मळेकर

गेल्या शतकाच्या पूर्वार्धात जगाला कलाटणी देणाऱया दोन महायुद्धांचे दूरगामी परिणाम मानवी जीवनावर झालेच. त्याची कारणमीमांसा करण्याचा उद्देश नाही, परंतु तिसरे महायुद्ध बहुदा पाण्यासाठी होईल हा द्रष्टय़ा जल व्यवस्थापन तज्ञांचा इशारा आपण वेळीच मनावर घेतला नाही तर तो पाणीपुरवठा करणारा निसर्गराजा आपल्याला खचितच क्षमा करणार नाही हे मात्र निश्चित.

मानवाच्या प्राथमिक अवस्थेपासून त्याला आधारभूत ठरलेला निसर्गराजा आजतागायत भरभरून देतच आलाय. या निसर्ग वैभवात मृदा, पत्थर, वनस्पती, पर्वत यांवर अधिसत्ता गाजवणारा प्रमुख निसर्ग घटक म्हणजे पाणी, पण या अत्यावश्यक पाण्याच्या संवर्धन-व्यवस्थापनाबाबत आमचे समाजमन हवे तसे सजग नाही. हे भान आमच्या पूर्वजांकडे निश्चितच होते. म्हणूनच पाण्याला धार्मिक अधिष्ठानासह देवस्वरूप देऊन अग्रपूजेचा मानही त्यांनी दिला.
‘पाण्याशिवाय जीवन शक्य नाही’ हे ध्यानी घेऊन जगातील सर्वच प्राचीन संस्कृतीना जलस्रोताच्या आधारे स्थैर्य लाभून त्यांचा विकासही झाला. प्राथमिक अवस्थेतील भटक्या मानवाला स्थैर्य प्राप्त झाल्यावर तो शेती करायला लागला. तेव्हापासून जगातील बराच भूभाग पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. आजच्या यांत्रिक युगातीलही विकासकामांचा आराखडा तयार करताना आवश्यक त्या पायाभूत सुविधांमध्ये जलस्रोताचा प्राधान्यात विचार केला जातोच.
प्राचीन काळी हिंदुस्थानींपाठोपाठ युनान, रोम, इजिप्त, इराण, चीन या देशांतही पाण्याचे मोल ध्यानी घेऊन त्यांच्या धार्मिक विधीत जलपूजेला धार्मिक अधिष्ठान प्राप्त झाले. मुंबईतील पारसी बावडी हे त्याचे उदाहरण आहेच. आपल्या दैनंदिन जीवनात अन्नाइतकेच शरीर स्वास्थ्यासाठी पाण्याला स्थान आहे. त्याशिवाय शेती, पायाभूत सुविधा, स्वच्छतेबरोबर पाणी हा तर उपचार पद्धतीसाठी प्रभावी स्रोत आहे. निसर्गसहवासात संचार करणाऱया प्रत्येक सजीवाला पाण्याची आवश्यकता आहे. त्याचा शोध घेण्यासाठीच प्रसंगी त्यांचे स्थलांतर होते.

जखमी झालेली जनावरे वाहत्या पाण्यात आपली जखम धुऊन घेत स्वतःवर उपचार करून घेतात. पाण्याचा योग्य प्रमाणात आहारात उपयोग केल्याने आपल्या शरीरातील अतिरिक्त उष्णता बाहेर पडण्यास त्याची मदत होते. वेळापत्रकानुसार योग्य प्रमाणात पाण्याचा आहारात समावेश केल्यास आपले शरीर सक्रिय राहून नैसर्गिकपणे रोगप्रतिकारशक्तीची वाढ होते. आपल्या शरीरातील दूषित घटक नष्ट करण्यासाठी पाणी उपकारक आहे. आम्लपित्त, जळजळ नाहीशी करून अन्नपचनासाठी पाणी अत्यावश्यक आहे. आपत्कालीन स्थितीत माणसाची शुद्ध हरपल्यावर त्याला पूर्ववत करण्यास पाणी हा तर प्रथमोपचार आहे. आधुनिक जीवनशैलीत आहाराच्या ज्या अनिष्ट पद्धती आल्यात, त्यातून आम्लता, बद्धकोष्ठता हे विकार बळावल्याने ते नाहीसे करून पाणी परिणामकारी उपचार ठरलाय. जखम झाल्यास होणारा रक्तप्रवाह रोखण्यास पाणी म्हणजे प्राथमिक उपचार, शारीरिक व्याधीवरील उपचाराप्रमाणे मानसिक स्वास्थ्याचा समतोल राखण्यासाठी पाणी उपकारक आहे. रुद्रावतार धारण केलेल्या माणसाला त्याचा क्रोध, राग, हृदयाची धडधड शांत करण्यासाठी पाणी प्राशन करण्याचा उपाय आपण नेहमीच अनुभवतो.

आपल्या दैनंदिन जीवनात अन्नाइतकाच पाणी हा घटक सर्व व्यापी नैसर्गिक आधारवड ठरला आहे. तरी सर्वप्रकारचे प्रदूषण, पर्यावरण, वनस्पती, सार्वजनिक आरोग्याप्रमाणे पाण्याचे संवर्धन आणि व्यवस्थापनाच्या बाबतीत समाजमनात जाणिवेची उणीवच दिसते. पृथ्वी माणसाच्या आवश्यक त्या गरजा भागवू शकते, लालसा नाही भागवणार हे जाणवत असूनही आमचा विकास (हव्यास) म्हणजे निसर्गाचा ऱहास यानुसार पाण्यासह निसर्गसंपत्तीचा वारेमाप ऱहास करत जी विकासकामं चालली आहेत. त्याचा दूरगामी परिणाम पाण्याच्या साठय़ावर व्हायला लागला आहे.

भूगर्भशास्त्रज्ञांच्या अभ्यासपूर्ण संशोधनानुसार केवळ पावसाने सरासरी ओलांडल्याने भूगर्भातील पाणीसाठा वाढत नाही. अतिवृष्टी होऊनही भूपृष्ठभागावरील उंचसखलपणामुळे पावसाचे पाणी भूगर्भात झिरपण्यासाठी कायमस्वरूपी सिंचन प्रकल्पाची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी जमिनीवरील पाणी साठवणूक क्षमता वाढवावी लागते. मुंबईच्या हाकेवरील पूर्व ठाणे जिह्याची नुकतीच प्रसिद्ध झालेली आकडेवारी हेच दर्शवितेय. जलसंपत्तीसह निसर्गातील विविधता आहे, ती कधीच कृतघ्न होत नाही. निसर्ग तर दाताच आहे. तसाच तो प्रसंगी मानवी चुकांना त्यांची जागा दाखवत क्रूरही होऊ शकतो. मानवी जीवनावर सर्वोच्च अधिसत्ता गाजवताना त्याच्या ठायी भेदभाव नसतो.

आता शिक्षणाचा प्रसार झाल्याने समाजातील सर्वच स्तरांतील सुशिक्षितांचे प्रमाण वाढते आहे, पण आमच्या दैनंदिन अत्यावश्यक गरजा भागवणाऱया पाणी या प्रमुख निसर्ग घटकाचं मोल जाणण्याचा, सुसंस्कृतपणाच्या जाणिवेचा सजगपणा आम्हाला कधी येणार? आता पर्यटनाच्या विविध शाखा विस्तारित होत आहेत. त्यातील वनपर्यटन (ECOTOURISM) शाखा. परस्पर निसर्ग वाचनासाठी लोकप्रिय होत आहे. याद्वारे पर्यावरणाच, तसेच वनस्पती संवर्धनाचं मोल समाजमनात यावं हा प्रधान हेतू आहेच, परंतु या वनपर्यटन शाखेतील वनवैभव समृद्ध करणारे जे जलाशय आहेत ते म्हणजे निसर्गवैभवासह पशुपक्ष्यांच्या अधिवासाला आधार आहे. मात्र वनपर्यटनाची संकल्पनाच ध्यानी न आलेल्या असंस्कृत पर्यटकांच्या बेफिकीरपणाच्या वागण्याने हे जलाशय प्रदूषित होत आहेत. प्लॅस्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, उरलेले अन्नपदार्थ, निर्माल्य त्यामध्ये विसर्जित करून सध्या जलप्रदूषणात भरच टाकली जातेय. पर्यावरण संवर्धनाचा अभाव आणि कायद्याचा धाक नसल्याने हा प्रकार सर्वच जलाशयाठिकाणी अनुभवायला येतो.

जलाशयाचा सर्वात मोठा साठा सागर, महासागरात आहे. आम्हाला दैनंदिन जीवनोपयोगी अनेक घटक उपलब्ध करून देणारा हा दयाघन रत्नाकर म्हणजे सध्या प्रदूषित रासायनिक पाणी आणि कचऱयाची विल्हेवाट लावण्याचे डंपिंग ग्राऊंड झाले आहे. खरं तर हा स्वतंत्र लेखाचाच विषय आहे. दैनंदिन जीवनातही पाण्याचा होणारा अपव्यय टाळणं शक्य असूनही ‘आम्हा काय त्याचे’ हीच भावना सर्वत्र दिसते. माणसाच्या वाढत्या गरजांपोटी आता घरांचे आकारमानही बदलायला लागले आहे. बऱयाच घरांची गच्ची, व्हरांडे दररोज धुण्याचे प्रयोजन काय? घरातील अंतर्गत भागातही लादी, फरशी स्वच्छतेसाठी बोअरवेलचे पाणी वापरणे शक्य आहे. हॉटेल तथा उपाहारगृहात घोटभर पाण्यासाठी संपूर्ण ग्लासभर पाण्याची नासाडी आपण नेहमीच अनुभवतो. त्यासाठी पाण्याने भरलेला जग ठेवल्यास हवे तितकेच पाणी घेणे शक्य आहे. हे सर्व टाळणे अखेर आपल्याच हाती आहे, पण त्यासाठी हवे ते सामाजिक भान.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या