
सामना प्रतिनिधी, कळवण
सप्तशृंगी देवीच्या गडावर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या प्रयत्नातून तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत तसेच ग्रामनिधी व 14 वित्त आयोगाच्या निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन सरपंच सुमनबाई सूर्यवंशी व उपसरपंच राजेश गवळी यांच्या हस्ते करण्यात आले.
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर वर्षातून दोन वेळा म्हणजे नवरात्रोत्सव व चैत्रोत्सव काळात यात्रा भरत असते. या काळात संपूर्ण देशातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी गडावर हजेरी लावत असतात. तसेच वर्षभर गडावर गर्दीच असते. गडावर येणाऱ्या भाविकांसाठी जागे अभावी ग्रामपंचयतीला पुरेशा सुविधा पुरविता येत नव्हत्या यात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, धर्मशाळा, शौचालय, नवसपूर्ती निवारा, रस्ते आदींचा समावेश होता. सप्तशृंगी गडावर नवसपूर्तीसाठी येणाऱ्या भाविकांना पाणी मिळेल त्याठिकाणी कार्यक्रम करावा लागत असे. तर काही भाविकाना पाण्याअभावी कार्यक्रम न करताच माघारी फिरावे लागत असे.
ग्रामपंचायत उपसरपंच राजेश गवळी यांनी ही बाब लक्षात घेऊन तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत ग्रामविकास राज्यमंत्री यांच्या माध्यमातून विविध विकास कामे मंजूर करून घेतले आहेत. यात शिवालय तलाव व म्हमादेवी परिसरात 20 हजार लिटरची पाण्याची टाकी पाणपोई व पाईपलाईन, तसेच भाविकांसाठी याच परिसरात 20 शौचालये, दाजीबा महाराज समाधी व सूर्यकुंड महादेव मंदिर रस्ता, स्मशान भूमीत शवदाहिनी बसविणे आदी कामाचा भूमिपूजन शुभारंभ सरपंच सुमनबाई सूर्यवंशी व उपसरपंच राजेश गवळी यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच इतर विकास कामे ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधी व 14 वित्त आयोगाच्या निधीतून सुरू आहेत. या शुभारंभ प्रसंगी उपसरपंच राजेश गवळी, माजी उपसरपंच गिरीश गवळी, सदस्य, कर्मचारी, ग्रामसेवक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
सप्तशृंगी गडावर ग्रामपंचायतीची जागा कमी व वनविभागाची जास्त असल्याने विकास कामे करण्यास अनेक मर्यादा आहेत. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या माध्यमातून वनविभागाकडून 10 एकर जागा मिळाल्यापासून भाविकांच्या सोयीसाठी विविध विकास कामे सुरू आहेत. तर काही कामे प्रस्तावित आहेत. नवसपूर्ती करण्यास येणाऱ्या भाविकांना 20 हजार लीटर पाणपोईमुळे लाभ होणार आहे.
– राजेश गवळी, उपसरपंच
























































