
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी धरण आटल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांसमोर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. आजूबाजूच्या गावातील सुमारे 22 हजार ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या ग्रामस्थ पाणी विकत घेत आहेत. प्रशासनाकडून टॅंकरने पाणीपुरवठा व्हावा, याची ग्रामस्थ प्रतीक्षा करत आहेत.
कळझोंडी धरणाचे काम दोन वर्ष रखडले आहे. यंदा डिसेंबर महिन्यातच कळझोंडी धरणातील पाणी आटल्यामुळे परिसरात पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे. कळझोंडी धरणावर परिसरातील 14 गावे अवलंबून आहेत. त्यामध्ये सैतवडे, जांभारी, वाटद, कळझोंडी, गडनरळ, आगरनरळ, पन्हळी, सत्कोंडी, कांबळेलावगण, चाफेरी, कासारी आणि वरवडे या गावांचा समावेश आहे. या गावातील सुमारे 22 हजार ग्रामस्थांसमोर पाणीटंचाईचा प्रश्न उदभवला आहे. कळझोंडी धरणातील पाण्यावर ग्रामस्थ अवलंबून असल्यामुळे त्यांना आता पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. परिसरातील ग्रामस्थ सध्या पाणी विकत घेत आहेत. मात्र हे पाणी विकत किती दिवस आणणार? हा प्रश्न आहे. प्रशासनाकडून टॅंकरने पाणी पुरवठा व्हावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.



























































