शिरूरच्या 9 गावातील पाणी प्रश्न पेटला, नागरिकांची पाण्यासाठी वणवण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कवठेयेमाई

शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील 9 गावातील पाणी प्रश्न गंभीर झाला असून आता या भागातील नागरिक संघटितपणे पाणी मिळण्यासाठी एकवटले आहेत. तालुक्यातील कान्हूर मेसाई येथे राष्ट्रावादी युवक काँग्रेसचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सुधीर पुंडे यांच्या नेतृत्वाखाली दहा गावातील नागरिकांची पाणीप्रश्नासंदर्भात महत्वपूर्ण बैठक झाली. यावेळी कान्हूरमेसाई, खैरेनगर, खैरवाडी, मोराचीचिंचोली, शास्ताबाद, मिडगुलवाडी, घोलपवाडी, गारकोलवाडी, फलकेवाडी, ढगेवाडी व इतर गावातील नागरिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या भागात संपूर्ण पावसाळा कोरडा गेला. पाण्याचे सर्व स्रोत आटले आहेत. तळे, नाले ठणठणीत कोरडे पडलेत, पावसाअभावी शेतातील पिके करपली आहेत.नागरिकांना आतापासूनच टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. जनावरांना चारा आणि पाणी मिळत नाही. आता ऐन हिवाळ्याच्या तोंडावर पाणीच नसल्याने आता करायचे काय असा मोठा प्रश्न या भागातील नागरिकांमध्ये उभा आहे. गावातील पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे लोकप्रतिनिधीकडून वेळोवेळी नागरिकांना आश्वासन दिले गेले पण स्वातंत्र्यानंतर आजतागायत या भागातील पाणी प्रश्न कायमच आहे. तालुक्याच्या पठारी भागात असणाऱ्या कान्हूर मेसाई, मोराची चिंचोली, खैरेनगर व इतर भागात आताच पाणी टंचाईचे संकट अत्यंत बिकट झाले आहे. या गावांसाठी चासकमानच्या डाव्या कालव्यातून पाईपलाईनद्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

या 9 गावातील पाणी संकट तीव्र झाल्याने नागरिकांची एकत्र आले आहेत. ही समस्या सोडवली नाही तर आगामी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सुधीर पुंडे, मोराची चिंचोलीचे माजी सरपंच निवृत्ती नाणेकर, खैरेनगरचे माजी सरपंच रघुनाथ शिंदे, कान्हूर मेसाईचे माजी सरपंच बापूसाहेब ननवरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.