नगर जिह्यातील 27 गावे, 120 वाडय़ांना टँकरने पाणीपुरवठा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाऊस लांबल्याने जिह्यात दिवसेंदिवस टँकरची संख्याही वाढत आहे. सध्या जिह्यातील 27 गावे व 120 वाडी-वस्तीवरील 48 हजार 967 लोकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाऊस वेळेत न पडल्यास या महिन्यात टँकरच्या संख्येत आणखी वाढ
होऊ शकते.

सध्या टँकर सुरू असलेली सर्वाधिक 12 गावे पारनेर तालुक्यातील आहेत. त्यानंतर संगमनेर तालुक्यातील 8 गावांना, अकोल्यातील 3 गावांना, तर नगर तालुक्यातील 4 गावांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. मागील वर्षी चांगला पाऊस पडल्याने उन्हाळ्यात टंचाईजन्य स्थिती झाली नाही. परिणामी पाण्याच्या टँकरची संख्याही मर्यादित राहिली. जूनमध्ये पाऊस पडल्यास पाण्याची अडचण येत नाही. यंदा अर्धा जून महिना लोटला तरी पावसाची चिन्हे नाहीत. त्यामुळे जिह्यातील 50 हजार लोकसंख्या थेट टँकरवर आली. तेथे पाणीच नसल्याने टँकर सुरू करावे लागले आहेत.

यंदाच्या उन्हाळ्यात एप्रिलपर्यंत एकही टँकर जिह्यात सुरू नव्हता. थेट 18 एप्रिलला संगमनेर व अकोले तालुक्यात एक-एक टँकर सुरू झाला. त्यानंतर मे व आता जून महिन्यात टँकरची संख्या वाढून ती सद्यःस्थितीत 16 पर्यंत गेली आहे. जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर टँकरची संख्या आपोआप कमी होते. मात्र, पाऊस लांबल्याने टँकर वाढतच आहेत. याशिवाय पाण्याचे स्रोत आटल्याने अनेक ठिकाणच्या पाणीयोजना अडचणीत येण्याची शक्यता आहे.