
सामना ऑनलाईन । मुंबई
गेल्या महिनाभरापासून विदर्भ, मराठवाडय़ात उष्णतेची लाट असून आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा आणखी तीव्र होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून घामाच्या धारांनी मुंबईकरांना अक्षरशः हैराण केले आहे. येत्या दोन दिवसांत मुंबईसह कोकणात हलका पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
विदर्भ आणि मराठवाडय़ात अजूनही तापमान चाळिशीच्या वरच आहे. तीव्र पाणीटंचाई भासत असून हंडाभर पाण्यासाठी महिलांना कित्येक मैल चालून जावे लागत आहे तर विहिरी, नद्या, धरणांनी तळ गाठला आहे. अनेक भागांत तर विहिरी कोरडय़ाठाक पडल्या आहेत. यंदा पावसाने वेळेवर हजेरी लावली नाही तर विदर्भ, मराठवाडा दुष्काळाने होरपळून निघेल तर पाणीटंचाई आणखी तीव्र होईल.
…म्हणून मुंबईत पावसाची शक्यता
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत ढगाळ वातावरण आहे. शुक्रवारीही मुंबईत ढगाळ वातावरण होते. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मुंबईसह कोकणात हलका पाऊस पडेल अशी माहिती हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक ए. के. श्रीवास्तव यांनी सांगितले.
‘फनी’ वादळाचा परिणाम
ओडिशाला तडाखा देणाऱ्या ‘फनी’ वादळाचा परिणाम म्हणून राज्यात उन्हाचा कडाका कमी होईल आणि मुंबईत पाऊस पडेल असा दावा हवामानतज्ञ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी केला आहे. पुण्यात श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फनी’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळेच विदर्भ, मराठवाडय़ात उष्णतेची लाट आल्याचा दावा त्यांनी केला.


























































