पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण, 100 टक्के फेकूगिरी; नालेसफाईचा दावा ढगात, अनेक ठिकाणी पाणी भरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रखडलेल्या पावसाने मुंबईत दमदार एंट्री घेतली असून पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण उडाली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी भरल्याने शंभर टक्के नालेसफाई झाल्याचा दावा करणाऱ्या मिंधे सरकार आणि त्यांच्या आदेशावरून पालिकेत मनमानी करणाऱ्या प्रशासकांच्या कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. अवघ्या 24 तासांत 1200 तक्रारींचा पाऊस पडला असून पहिल्याच पावसात मुंबईची ही अवस्था असेल तर पुढे संपूर्ण पावसाळाभर मुंबईची काय दशा होणार, असा सवाल मुंबईकर विचारू लागले आहेत.

मुंबईत शनिवारी मान्सून दाखल झाला. त्यानंतर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. सलग दोन दिवस चांगला पाऊस झाल्याने हवेत थोडासा गारवा निर्माण झाला असला तरी मुंबई पालिकेत सध्या सुरू असलेल्या कारभाराची मात्र या पावसाने पोलखोल केली.

पावसाचा जोर उद्या वाढणार

27 जून रोजी राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, रत्नागिरी, अमरावती आणि नागपूर जिह्यांना ऑरेंज ऍलर्ट जारी करण्यात आला आहे.

नालेसफाई शंभर टक्के झाल्याचे दावे पालिकेकडून करण्यात येत होते, मात्र गेल्या 24 तासांत पडलेल्या पावसाने काही ठिकाणी नाले तुडुंब भरून पाणी वस्त्यांत शिरले, रस्त्यांवर आले.

पालिकेची पोलखोल

मिलन सबवेत पाणी भरले. पाणी तुंबल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागली.

मुंबईत मेट्रो, कोस्टल रोड आणि रस्त्यांची अनेक कामे रखडलेली आहेत. रस्ते खोदून ठेवलेले आहेत. त्याचा मोठा मनःस्ताप मुंबईकरांना सहन करावा लागला.

पाणी तुंबण्याच्या तक्रारी अनेक ठिकाणांहून आल्या. त्यामुळे वाहतूककोंडीचीही समस्या निर्माण झाली आहे.

अंधेरी सब वे जलमय होऊन शनिवारी अनेक गाडय़ा वाहून गेल्या. काहींनी दोरीने आपल्या गाडय़ा बांधून ठेवल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. येथे गटारातून प्रचंड गाळ बाहेर आला आहे.

बघा मिंधे काय म्हणतात… पावसाचे स्वागत करा, पाणी तुंबल्याच्या तक्रारी काय करता

पहिल्याच पावसात मुंबईत पाणी तुंबल्याने पालिकेचे प्रशासक आणि मिंधे सरकारविरोधात मुंबईकरांमधून तीव्र संताप व्यक्त करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र समस्येची जबाबदारी न घेता मुंबईकरांनाच दरडावण्याचे काम केले आहे.

पहिल्याच पावसात मुंबईत अनेक ठिकाणी पाणी भरले. त्याबाबतच्या असंख्य तक्रारी आल्या असून त्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ‘पावसाचे स्वागत करा, पाणी तुंबल्याच्या तक्रारी काय करता,’ असा उलट सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. पाऊस आता आला आहे. तो पडू द्या. त्याचे स्वागत करा. आम्हाला बदनाम करण्यासाठी बराच वेळ आहे, असे सांगताना जिकडे पाणी तुंबले तिकडच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू आणि जिकडे पाणी तुंबणार नाही तिकडच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करू, असे मुख्यमंत्री शनिवारी रात्री उशिरा माध्यमांशी बोलताना म्हणाले.