हम तुम्हे शहीद कहेंगे…!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>यादव तरटे पाटील

जंगलांच्या रक्षणाची खरी जबाबदारी पार पाडतात ते वनरक्षक. मात्र नुकत्याच घडलेल्या काही घटनांमुळे ही जबाबदारी पार पाडत असताना त्यांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते याचा अंदाज येतो. अपुऱया सुविधा आणि साधनांमुळे अटीतटीच्या परिस्थितीतून मार्ग काढणं वनरक्षकांना दिवसेंदिवस कठीण होताना दिसतेय.

भारतीय व्याघ्र प्रगणना कार्यक्रमांतर्गत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्राण्यांची गणना कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी स्वाती ढुमणे या महिला वनरक्षकावर वाघिणीने हल्ला केला. या हल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कोलारा येथील गाभा क्षेत्राच्या (कोअर झोन) कक्ष क्रमांक 97 मध्ये शनिवारी घडली. स्वाती ढुमणे यांनी कोलारा बीट येथे 3 सहायकांसह सकाळी 7 च्या सुमारास मांसभक्षी व मोठय़ा तृणभक्षी प्राण्यांच्या पाऊलखुणांचे सर्वेक्षण सुरू केले होते. कोलारा गेटपासून कम्पार्टमेंट क्रमांक 97 पर्यंत सुमारे 4 कि.मी. पायी चालत गेल्यावर त्यांना सुमारे 200 मीटर अंतरावर एक वाघीण बसलेली दिसली. त्यांनी सुमारे अर्धा तास वाट पाहिली. त्यांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, परंतु याचदरम्यान वाघिणीने स्वाती यांच्यावर हल्ला केला. या घटनेमुळे व्याघ्र प्रगणना कार्यक्रमाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.

गतवर्षी ग्वाल्हेरच्या मोहना रेंजमधील वनरक्षक दीपूसिंग राणा यांची शिकाऱयांनी गोळ्या घालून हत्या केली. ही बातमी ऐकून मन सुन्न झालं. गुन्हा केल्यावर शिकारी पळून गेला. जखमी झालेल्या राणा यांना ग्वाल्हेरमधील जैरोग्य रुग्णालयात घेऊन गेले, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. डॉक्टरांनी वनरक्षक दीपू राणा यांना मृत घोषित केले. वनसेवेत दाखल झालेल्या व इमानेइतबारे आपले कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या वनसेवकांना शहिदाचा दर्जा मिळावा अशी मागणी आता वन कर्मचारी संघटना व वन्यजीव प्रेमींनी केली आहे. त्याचबरोबर वन कर्मचारी संघटनेने हेदेखील म्हटले आहे की, तस्कर आणि शिकाऱयाविरुद्ध लढण्यासाठी आम्हा वन कर्मचाऱयांना आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केले पाहिजे. वन विभागाने दीपू राणाच्या हत्येच्या चौकशीचे आदेश दिलेत, मात्र दीपू राणाच्या बाबतीत पुढे काय घडलं याची खबर आली नाही. वन विभागाने वनरक्षक दीपू राणा यांच्या कुटुंबाला 50 हजार रुपयांची मदत दिली होती. मात्र यातून मूळ प्रश्न सुटला नाही आणि भविष्यातही सुटणार नाही. खोलवर झालेल्या जखमेवर वरचेवर मलम लावल्याने जखम भरत नसते हेच यानिमित्ताने पुढे येते.

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे अत्यंत संवेदनशील असल्याने त्यांनी तत्काळ स्वाती ढुमणे यांना 15 लाख रुपयांची मदत दिली तसेच स्वाती यांच्या पतीला वन विभागात कायमस्वरूपी नोकरी देण्याची हमी दिली. ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी तत्काळ स्वाती यांच्या पतीला 50 हजार रोख मदत, 5 लाखांचा धनादेश व ताडोबा फाऊंडेशनमध्ये नियुक्ती दिली आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या तत्काळ निर्णय घेऊन उपाययोजना करण्यात आली. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे वन विभागाचे पालकत्व असताना त्यांनी खऱया अर्थाने वन हुतात्मा स्वाती ढुमने यांना श्रद्धांजली दिली आहे. महाराष्ट्राने संपूर्ण देशासाठी या माध्यमातून एक चांगला संदेश दिला आहे.

खरं तर मानवाला लागणाऱया प्राणवायू, पाणी आणि अन्न देणाऱया जंगल रक्षणाची जबाबदारी वन विभागाच्या याच शिलेदारांकडे आहे. तळागाळात राहून प्रत्यक्षात काम करणाऱया वनरक्षक, वनपाल आणि त्यांना पाठबळ देणाऱया वनसेवेतील वनाधिकारी यांच्यामुळे ही आपली राष्ट्रीय संपती टिकून आहे. वनरक्षकाच्या भाषेत जसाच्या तसा हा संवाद इथे मांडतोय. एका कर्तव्यदक्ष वनरक्षकासोबत जंगलात आम्ही गस्त करताना दबक्या आवाजात तो मला म्हणाला, “ भाऊ, माझ्या कार्यकक्षेत 900 हेक्टर जंगल, त्यात लाखो झाडे, करोडो जीवजंतू, लाखो प्राणी आणि करोडो रुपयांची जमीन आहे. अनमोल जैवविविधता व जीवनावश्यक ऑक्सिजन देणारी झाडे यांचे संरक्षण करण्यासाठी फक्त एक वनरक्षक आणि माझ्या जवळ एक साधी फायबरची लाठीदेखील नाही. शिकाऱयापासून व जंगलतोड करणाऱयापासून बचावासाठी एक बंदूकसुद्धा नाही. वन विभागाच्या ताब्यात बंदुका आहेत. मात्र त्या कित्येक दिवस स्वच्छ केलेल्या नाहीत. त्या गंज खात पाडल्या आहेत. कसे होणार जंगल संरक्षण! वनरक्षक हे पद नावासाठी क्लास-3 व त्याला पगार मात्र क्लास-4 चा आहे. करोडो रुपयांच्या संपत्तीचे हे जंगल सांभाळायला लावता त्याला आणि पगार साध्या चौकीदाराचा…! कुठेतरी बदल होण्यास आंदोलन केले तर सेक्शन- 10 ची कारवाई आहेच. लहान कर्मचारी आहे म्हणून त्याचे तोंड दाबायचे इतकंच या व्यवस्थेने आजवर केलं.’’ हे सगळं बोलताना त्याचे डोळे पाणावले होते. पुढे त्याने हीसुद्धा व्यथा मांडली. समान काम समान अधिकार आम्हाला मिळायला हवा.

जंगलात मरतो वनरक्षक, पण त्यानं कुणालाच कसा काहीच फरक पडत नाही! पहिले वन विभागाचा जो पालनहार आहे त्यालाच सक्षम करा म्हणा, मग वाचेल जंगल. कोरोना काळात वनरक्षक रोज जंगलात फिरत होते. स्वतः च्या संरक्षणासाठी त्याला संरक्षण कवच एक रुपयाचं नाही. ही एका वनरक्षकाच्या मनातील भावना असल्याचे तो म्हणाला. भाऊ बदल हवा, आता बदल हवा. पुढे तो म्हणाला की, भाऊ यावर तुम्ही काही करत का नाही हो, गुरुजी हे सर्व मुद्दे आपल्या लेखणीत मांडा. निदान आमच्या जखमेवर फुंकर घातल्या जातील, तितकाच आमच्या मनावरचा भार हलका होईल. हे सर्व ऐकून मी निःशब्द झालो. एका वनरक्षकाच्या विश्वात जाऊन पाहताना मी पुरता आतून हादरलो. तक्षणी याच निसर्गाच्या कुशीत वाढणाऱया झाडा, पानाफुलांच्या संगतीने या आमच्या वनरक्षकांच्या जीवनातही नवीकोरी पालवी फुटून त्यांचेही जीवन बहरू दे ही प्रार्थन केली.

वनरक्षकासोबत जेव्हा असे जीवघेणे प्रसंग घडतात तेव्हा मात्र नकारात्मक वातावरण निर्माण होते. जंगलात नियमित गस्त करणे, वन जमिनीवरील अवैध अतिक्रमण हटविणे, वनाचे आणि वन्य जीवांचे शिकाऱयांपासून रक्षण करणे, अवैध वृक्षतोड करणाऱयावर कारवाई करणे, वन्य प्राण्यांचे रक्षण करणे, वन्य प्राणी जिथे पाणी प्यायला येतात त्या नैसर्गिक व कृत्रिम पाणवठय़ाचे व्यवस्थापन करणे, वणवा लागू नये म्हणून काळजी घेणे, वणवा लागल्यास तो विझविणे, मानव-वन्य जीव संघर्ष निर्माण झाल्यास सेवा देणे व प्रसंगी त्यांचे व्यवस्थापन करणे, वन्य प्राणी मनुष्यवस्तीमध्ये किंवा वस्तीलगत आढळल्यास रेस्क्यू करणे, आपली बीट, वनखंड, वनवर्तुळ आणि वनपरिक्षेत्राची नियमित पाहणी करणे. एकूणच जंगलाला होणाऱया संभाव्य धोक्यापासून संरक्षण करणे अशी अनेक कामे वनरक्षकांना निःशस्त्र राहून करावी लागतात. एकीकडे वाढत्या शिकारी व इतर अवैध घटना घडत असताना त्यांच्यावर असे हल्ले होतात वा त्यात त्यांच्या मृत्यूही होतो. असे आजवर किती वनरक्षक मृत पावले याची कुणाकडे आकडेवारीसुद्धा नाही. अमरावती जिह्यातील पूर्व मेळघाट वन विभागांतर्गत अकोटमधील ज्ञानेश्वर चिंचोळकर आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱया सेमाडोह येथील विशाल मेहरे या दोन वनरक्षकांवर काही दिवसांपूर्वी स्थानिकांनी हल्ला केला होता. त्यात ते जखमी झाले. दि. 5 मे 2020 रोजी मेळघाटमध्ये सकाळी एक महिला वनरक्षक आपले कर्तव्य बजावत होती. शेतजमिनीवरील अवैध अतिक्रमणाबाबत कारवाई करताना त्यांना शिवीगाळ करण्यात आली आणि ऍट्रोसिटीअंतर्गत तक्रार करू अशी धमकी देण्यात आली. वनसंरक्षण कायद्याचे पालन करताना दुसऱया कायद्याचे बळी ठरत असल्याच्या घटना वाढत आहे. ही नाण्याची दुसरी बाजू लक्षात घेणे गरजेचे आहे.

वनरक्षक आपली सेवा देताना त्यांच्यावर होणारे हल्ले निश्चितच निषेधार्ह आहेत. त्यांना उचित न्याय मिळेल याबाबत पावले उचलण्याची आवश्यकता आहे. जंगल रक्षण करताना स्थानिक पातळीवर येणाऱया अनेक अडचणी यातून पुन्हा एकदा नव्याने समोर आल्या आहेत. स्थानिक गावकऱयांशी संवाद ठेवून, प्रसंगी कठोर कारवाई करताना अनेकदा अशा जीवघेण्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं. हे वनरक्षक व तमाम वनसेवेत कार्य करणाऱयांना अडचणीचे ठरत आहे. यातून मार्ग काढल्यास ही वनसंपत्ती टिकून राहील. नाहीतर ‘शहीद वनरक्षक अमर रहे’ यापलीकडे आमच्या हाती काहीही राहणार नाही.
(लेखक महाराष्ट्र राज्य वन्य जीव
मंडळाचे सदस्य आहेत)
[email protected]