नगर शहरात शस्त्रसाठा जप्त; दोघांना अटक, कोतवाली पोलिसांची कारवाई

तलवार, कोयते, गुप्ती बाळगल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या झाडाझडतीत पोलिसांनी शस्त्रसाठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

कुणालसिंग कमलसिंग जुन्नी (वय 19, रा. काटवन खंडोबा), अर्शद रशिद शेख (वय 22, रा. इमामवाडा, नवीन टिळकरोड, नगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

कोतवाली पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार नगर शहरातील काटवन खंडोबा कमानीजवळ कुणालसिंग कमलसिंग जुन्नी हा अवैध हत्यारे बेकायदेशीरपणे बाळगून विक्री करीत असल्याचे समजले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कोतवाली पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदारांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

पोलिसांनी सापळा रचून कुणालसिंग जुन्नी याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून दोन तलवारी, एक कोयता. एक सत्तुर अशी हत्यारे जप्त केली. तसेच एक मोठा कोयता व एक चाकू त्याने अर्शद रशिद शेख याचा असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अर्शदलाही ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस नाईक सलीम शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, सतीश भांड, दीपक बोरुडे, योगेश भिंगारदिवे, सलीम शेख, रियाज इनामदार, अभय कदम, अतुल काजळे, सुजय हिवाले, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, शरद धायगुडे, कावेरी फुगारे यांच्या पथकाने केली.