महाराष्ट्रात थंडीची चाहूल; तीन दिवसात तापमानात घट होण्याचा हवामान खात्याचा अंदाज

cold-in-nashik

राज्याने गेल्या महिन्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा अनुभवला आहे. त्यानंतर आता राज्यातील वातावरण कोरडे आहे. तसेच तापमानातही काही अंशांनी वाढ झाली आहे. यंदाचे तापमानवाढीचे वर्ष असल्याने हिवाळा कमी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता हवामान खात्याने दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. राज्यात आता तीन दिवसात तापमानात घट होण्याची शक्यता असून राज्यात थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

सध्या राज्यभरात कोरडे वातावरण आहे. पुढील तीन दिवस राज्याच्या अनेक भागात किमान तापमानात सरासरी दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यावर सध्या कोणतीही हवामान प्रणाली सक्रिय नाही. त्यामुळे 23 नोव्हेंबरपर्यंत किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

येत्या तीन दिवसात सरासरी दोन ते तीन अंश सेल्सिअसने तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा जाणवेल. राज्यात 23 नोव्हेंबरपासून आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढेल. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात कमाल तापमानात वाढ होईल. दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. अनेक ठिकाणी पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात आता थंडीची चाहूल लागणार असल्याचेही हवामान खात्याने म्हटले आहे.