
एलियन्स अर्थात परग्रहवासी अस्तित्वात आहेत का? आहेत ते कुठे आहेत? कसे दिसतात? त्यांची जीवनशैली काय आहे? ते संवाद कसे साधतात? त्यांचे वसतिस्थान कुठे आहे? ते प्रवास कसा करतात? असे असंख्य प्रश्न, त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी चालू असलेले प्रयत्न, परग्रहवासीयांना, त्यांच्या यानांना बघितल्याचे केलेले दावे हे जगभरातील सर्वात आवडीचे असे विषय मानले जातात. कथा, कादंबरी, चित्रपट, सीरियल यासाठी ‘एलियन’ हा विषय म्हणजे हमखास यशाची गॅरेंटी मानली जाते. एलियन्सचा विषय निघाला की, एक नाव हमखास समोर येते आणि ते म्हणजे जॉन रामिरेझ या भूतपूर्व CIA अर्थात अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या माजी कर्मचाऱयाचे.
एलियन्स आणि UFO यासंदर्भातील विषयामध्ये जॉनला तज्ञ मानले जाते. त्याने 25 वर्षे CIA मध्ये काम केलेले आहे. एलियन्सच्या संदर्भात जॉनने अनेक थक्क करणारे दावे केले आहेत. काही महिन्यांपूर्वी त्याने ज्या प्रकारे आपण एलियन्सच्या शोधात आहोत, तसे तेदेखील आपल्या अभ्यासात मग्न असल्याचा दावा केला होता. आपल्या शेजारच्या आकाशगंगेमध्ये अनेक एलियन्सची याने आहेत. जसे आपण इतर ग्रहांवर यान पाठवून त्यांचा अभ्यास करतो, अगदी तसेच हे एलियन्स पृथ्वीवर छोटी छोटी याने पाठवून मानवाचा अभ्यास करत असतात असेदेखील त्याने सांगितले होते. जॉन पुन्हा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्याने केलेला नवा दावा होय. या दाव्यात त्याने काही एलियन्स हे मानवी वस्तीत मानवांमध्ये राहत असल्याचा दावा केला आहे. हे एलियन्स सरपटणाऱया प्राण्याच्या रूपात, जसे की पाल, सरडा इ. वावरत असल्याचे त्याचे म्हणणे आहे. खरे तर त्यांचे रूप फार वेगळेच आहे. चित्रपटात दाखवतात तसे तर ते बिलकूल दिसत नाहीत, असे जॉन सांगतो. एलियन व त्यासंदर्भात अमेरिकेकडे ठोस अशी माहिती आहे. मात्र अमेरिका ती कायम लपवत असते असा आरोप जगभरातून कायम होत असतो. आता जॉनच्या दाव्यावर CIA काय प्रतिक्रिया देते ही खरी उत्सुकता आहे.
































































