वेब न्यूज – डिजिटल डिटॉक्स हॉलिडेज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्पायडरमॅन

सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री झोप लागेपर्यंत ऑफिसचे ई-मेल्स, व्हॉट्सअ‍ॅपचे मेसेज, फेसबुक, इन्स्टाग्रामच्या रील्स आणि सतत येणारे नोटिफिकेशन यांमुळे माणसाचा मेंदू एका मिनिटासाठीही शांत नसतो. या मानसिक तणावातून आणि सततच्या ऑनलाइन राहण्याच्या थकव्यातून सुटका करून घेण्यासाठी आता एक नवा आणि भन्नाट ट्रेंड वेगाने लोकप्रिय होत आहे, तो म्हणजे डिजिटल डिटॉक्स हॉलिडेज.

डिजिटल डिटॉक्स म्हणजे काही काळासाठी इंटरनेट, मोबाईल, लॅपटॉप आणि सर्व प्रकारच्या गॅझेट्सपासून पूर्णपणे लांब राहणे. आतापर्यंत लोक सुट्टी साजरी करण्यासाठी रिसॉर्ट्स किंवा टूरिस्ट स्पॉट्सवर जायचे, पण तिथेही जाऊन त्यांचे फोटो काढणे, स्टेटस ठेवणे आणि ऑफिसचे फोन घेणे सुरूच असायचे. यावर उपाय म्हणून आता अशा विशेष रिसॉर्ट्स आणि हॉलिडे पॅकेजेसची क्रेझ वाढली आहे, जिथे गेल्यावर मोबाईल एका लॉकरमध्ये जमा करून घेतला जातो. या ठिकाणी वाय-फाय नसतो. सुरुवातीला काही तास लोकांना मोबाईलशिवाय अस्वस्थ वाटतं, ज्याला विज्ञानाच्या भाषेत नोमोफोबिया (मोबाईल नसण्याची भीती) म्हणतात, पण एकदा का तो टप्पा पार पडला की, निसर्गाशी आणि स्वतःशी नातं जोडलं जातं.

यंत्रांनी आपले आयुष्य सोपे केले आहे यात शंका नाही, पण आपण यंत्रांचे गुलाम होता कामा नये. नवरा-बायको किंवा एकत्र कुटुंब असूनही आपापल्या मोबाईलमध्ये व्यस्त असण्याचे प्रमाण आज वाढले आहे. जेव्हा गॅझेट्स बाजूला होतात, तेव्हा नात्यांमधील संवाद आणि जवळीक पुन्हा वाढते. काही काळ जगापासून डिसकनेक्ट व्हा, जेणेकरून स्वतःशी पुन्हा री-कनेक्ट होता येईल हाच संदेश या नव्या ट्रेंडमधून मिळतो.