वेब न्यूज – 2019 सालातले असुरक्षित पासवर्ड

941

>> स्पायडरमॅन

कॅलिफोर्नियाच्या ‘स्प्लॅशडाटा’ या सॉफ्टवेअर कंपनीने 2019 सालातल्या असुरक्षित अर्थात ओळखण्यास किंवा हॅक करण्यास सहजसोप्या असलेल्या आणि यूजर्सकडून वापरात आणल्या गेलेल्या शंभर विशेष पासवर्डसची यादी दिली आहे. या यादीसाठी तो पासवर्ड वर्षभरात हॅक झालेल्या पाच मिलियन्स पासवर्डस्च्या लिस्टमध्ये किती वेळा होता, त्याचा सोपेपणा इत्यादी निकष लावण्यात आले. संगणक आणि इंटरनेट सुरक्षा क्षेत्रातल्या तज्ञांनी वारंवार धोक्याचा इशारा देऊनदेखील जगभरात ‘password’ हाच शब्द पासवर्ड म्हणून वापरण्याचा अट्टहास कायम असल्याचे दिसते आहे. जोडीलाच ‘dragon’, ‘princess’ सारखे आश्चर्यकारक पासवर्डदेखील लोकांनी निवडल्याचे दिसते आहे. लोकांमध्ये पासवर्ड आणि इंटरनेट सुरक्षेबद्दल जागरूकता वाढावी आणि त्यांना आपल्या खात्यांचे संरक्षण करण्यात मदत मिळावी हाच दरवर्षी अशा प्रकारे पासवर्डसची यादी प्रसिद्ध करण्यामागे आमचा उद्देश आहे, असे स्प्लॅशडाटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मॉर्गन स्लेन यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. आजकाल इंटरनेट यूजर अधिक अवघड आणि गहन अशा पासवर्डसचा वापर करायला लागलेले आहेत असे दिसतंय, पण त्यांची संख्या अजूनही वाढण्याची गरज आहे. आजही जगभरात बरेच इंटरनेट यूजर हॅक करण्यास अथवा ओळखण्यास सहजसोपे असे पासवर्ड वापरताना दिसत आहेत. सुरक्षित पासवर्ड कसा तयार करावा याबद्दल ‘Norton Security’ने काही महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत – 1) वैयक्तिक माहिती असलेला पासवर्ड बनवणे टाळा. जसे की, तुमच्या कुत्र्याचे नाव, तुमची जन्मतारीख, बायको अथवा मुलांची नावे, गाडीचा नंबर इत्यादी पासवर्ड म्हणून वापरू नका. 2) हॅकर्स शक्यतो डिक्शनरीची मदत घेऊन पासवर्ड हॅक करणाऱया साधनांचा वापर तुमचा पासवर्ड शोधताना करतो. त्यामुळे शक्यतो सरळसोट स्पेलिंगचे शब्द वापरू नका. अशा शब्दात शक्यतो अशा स्पेशल अक्षरांचा वापर करावा. 3) शक्यतो 10 अक्षरांचा लांब पासवर्ड बनवावा. 4) तुम्हाला सहज आठवू शकतील असे शब्द, जसे की एखाद्या गाण्याची ओळ निवडा आणि तिला अवघड बनवून पासवर्ड म्हणून वापरा. जसे की – “100 Bottles of Beer on the Wall” पासून “100BoBotW” पासवर्ड तयार होऊ शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या