
पश्चिम बंगालमध्ये जोबा ओटपारा हे एक आदिवासी गाव आहे. गावातील अधिकतर लोक अशिक्षित. शिक्षणाच्या गंगेपासून कोसो दूर, मात्र हेच आदिवासी गाव आज स्वतःची नवीन कहाणी लिहीत आहे. गावातील प्रत्येक घराच्या भिंतींवर सुंदर आणि क्रिएटिव्ह फळा दिसत आहे. त्यावर फळाफुलांची नावे, पाढे आणि वर्णमाला असं बरंच काही आहे. लहान मुलांसोबत त्यांचे आईबाबाही शिकत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुलंच पालकांना शिकवत आहेत. हे साध्य करून दाखवलंय आसनसोलच्या दीपनारायण नायक यांनी. नायक यांनी पश्चिम वर्धमान जिह्यातील 12 गावांतील घरांच्या भिंतींना फळ्यामध्ये रूपांतरित केलंय. याच फळ्यांवर आज एक हजारांहून अधिक मुले आणि त्यांचे आईबाबा शिकत आहेत.
35 वर्षीय दीपनारायण नायक यांनी फार्मसी आणि बी.एड.चे शिक्षण घेतलंय. या उपक्रमाविषयी नायक सांगतात, कोरोना काळात शाळा बंद झाल्या. अशा वेळी मुलांचे शिक्षण थांबले. त्यांच्या शिक्षणासाठी भिंतीचे फळे करण्याची कल्पना सुचली आणि एका गावात प्रयोग केला. तो यशस्वी ठरल्यावर अन्य 11 गावांमध्येही पुनरावृत्ती केली.
दीपनारायण एकटय़ाने हा उपक्रम चालवतात. दररोज तीन ते चार गावांमध्ये जातात. ज्या दिवशी ते एखाद्या सेंटरवर जाऊ शकत नाहीत, तिथे मुले स्वतःच अभ्यास करतात. तसेच एकमेकांना शिकवतात. त्यामुळे शिक्षणात खंड पडत नाही. ते मुलांना वह्या, पुस्तके आणि शैक्षणिक साहित्याचेही वाटप करतात. नायक यांच्या कार्याची देशभरात प्रशंसा होत आहे.



























































