
मोहम्मद पैगंबरांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱया भाजपच्या निलंबित नेत्या नूपुर शर्मा आणि नवीनकुमार जिंदाल यांच्या अटकेसाठी मुस्लिम समाजाकडून देशभरात हिंसक आंदोलने सुरूच असून पश्चिम बंगालच्या हावडा येथे आज शनिवारी आंदोलकांनी पोलिसांवर पुन्हा दगडफेक केली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. तेथील बिघडलेली परिस्थिती पाहता पोलीस आयुक्त आणि अधीक्षकांची बदली करण्यात आली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप अधिकाऱयांच्या वादग्रस्त विधानावर टीका करत सोशल मीडियावर याप्रकरणी भाजपला जाब विचारला आहे. भाजपच्या गुह्यांची शिक्षा सर्वसामान्य नागरिकांनी का भोगायची, अशी विचारणा त्यांनी केली आहे. बॅनर्जी यांनी हावडा येथील हिंसाचारप्रकरणी म्हटले आहे की, या हिंसाचारामागे काही राजकीय पक्ष असून त्यांना आणखी दंगे घडवून आणायचे आहेत. दरम्यान, हावडा येथील हिंसाचारग्रस्त भागात जाण्याचा प्रयत्न करणाऱया बंगाल भाजप अध्यक्ष सुकांत मजुमदार यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथे नमाजानंतर उपद्रव करणाऱयांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस व तेथील प्रशासनाने शनिवारी अब्दुल वाकीर आणि मुजम्मिल या दोघा आरोपींच्या अनधिकृत घरांवर बुलडोझर चालवत बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली आहेत.






























































