पश्चिम विभागाचे अंतिम फेरीचे स्वप्न उद्ध्वस्त; रियान परागच्या झंझावाती शतकामुळे पूर्व विभाग अंतिम फेरीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

68 चेंडूंतील 6 चौकार आणि 5 षटकारांच्या जोरावर 102 धावांची झंझावाती खेळी करणाऱया रियान परागने पूर्व विभागाला मोठय़ा थाटात देवधर करंडकाची अंतिम फेरी गाठून दिली. त्याच्या घणाघातामुळे 7 बाद 319 अशी जबरदस्त मजल मारणाऱया पूर्व विभागाने बलाढय़ पश्चिम विभागाच्या रथी-महारथींना 162 धावांतच गुंडाळले आणि 157 धावांच्या दणदणीत विजयासह देवधर करंडकाची अंतिम फेरी गाठली. आता जेतेपदासाठी 3 ऑगस्टला त्यांची गाठ दक्षिण विभागाशी पडेल.

पूर्व विभागाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. अभिमन्यू ईश्वरन (38), उत्कर्ष सिंग (50) आणि विराट सिंग (48) यांच्या उपयुक्त खेळींमुळे पूर्व विभागाने सव्वाशेचा टप्पा गाठला होता. पण शम्स मुलानीच्या फिरकीने 3 विकेट बाद करत त्याची 5 बाद 157 अशी अवस्था केली, मात्र यानंतर रियान परागने डावाची सूत्रे आपल्या हाती घेत कुमार कुशाग्रसह सहाव्या विकेटसाठी 150 धावांची भागी रचत संघाला त्रिशतकी टप्पा गाठून दिली. कुशाग्रनेही 53 धावा केल्या. रियान 102 धावांवर नाबाद राहिला. त्याने पाच दिवसांपूर्वी उत्तर विभागाविरुद्धही 131 धावा ठोकल्या होत्या. त्याच्या आजच्या वेगवान खेळीमुळे पूर्व विभागाने 318 धावांचे अवघड आव्हान पश्चिम विभागासमोर ठेवले.

पश्चिम विभाग पूर्व विभाच्या आव्हानाचा पाठलागच करू शकला नाही. 32 धावांवर पहिला विकेट पडल्यावर मणिशंकर मुरासिंगने 20 धावांच्या अंतरात सलग चार षटकांत चार विकेट घेत पश्चिम विभागाची 5 बाद 52 अशी केविलवाणी अवस्था केली. येथेच त्यांचा पराभव निश्चित झाला होता. मुरासिंगने राहुल त्रिपाठी (3), सरफराज खान (0), कथन पटेल (0), शिवम दुबे (0) यांना बाद केले. त्यानंतर सलामीवीर हार्विक देसाईने शेवटपर्यंत झुंज देत 92 धावांची खेळी केली. तो सर्वात शेवटी बाद झाला. मुरासिंगने 28 धावांत 5 विकेट टिपले.

दक्षिणेचा विजय
साई सुदर्शनच्या 132 धावांच्या नाबाद खेळीमुळे दक्षिण विभागाने मध्य विभागाचा 7 विकेट्स आणि दहा चेंडू राखून पराभव करीत सलग पाचव्या विजयाची नोंद केली. मध्य विभागाने 9 बाद 261 अशी मजल मारली होती. तसेच यादव आणि मार्कंडे या मयांक जोडीने उत्तर पूर्व विभागाचा 101 धावांत खुर्दा पाडला आणि प्रभसिमरन सिंग (40) आणि हिमांशु राणा (52) यांनी दुसऱया विकेटसाठी 93 धावांची अभेद्य भागी रचत विजयी लक्ष्य 12.5 षटकांतच गाठले.