
पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलमधून दररोज दाटीवाटीने जीव मुठीत धरून प्रवास करणाऱया मुंबईकरांना खूशखबर आहे. पश्चिम रेल्वेने सोमवारपासून बारा डब्यांच्या लोकलला तीन डबे जोडून पंधरा डबे लोकलच्या आणखी सहा फेऱया चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सदरच्या गाडय़ांची प्रवाशी वाहतूक क्षमता 25 टक्क्यांनी वाढणार असल्याने प्रवाशांची गर्दीतून काहीशी सुटका होणार आहे. पश्चिम रेल्वेवर दररोज सुमारे 28 लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे मोठी गर्दी होत असल्याने सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी 15 डब्यांच्या लोकलच्या फेऱया वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने 15 डबा लोकलच्या सहा फेऱया वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंधरा डब्यांच्या लोकलच्या फेऱयांची एकूण संख्या 144 वरुन 150 होणार आहे. पश्चिम रेल्वेवर पहिली 12 डबा लोकल 1986 साली तर 15 डब्यांची पहिली लोकल 2006 मध्ये प्रवाशांच्या सेवेत आली आहे. सध्या पश्चिम रेल्वेकडे 15 डब्यांच्या नऊ लोकल आहेत.